जिल्हा परिषद शाळेतील दुर्घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी

वाशिम - राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था सतत चर्चेचा विषय ठरत आहे. अशाच एका दुर्घटनेत वाशिम जिल्ह्यातील भटउमरा गावात जिल्हा परिषद शाळेत शिकणारा सातवीचा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. वर्ग चालू असताना स्लॅबवरील प्लास्टर अचानक कोसळल्याने ही धक्कादायक घटना घडली.
हादरवून टाकणाऱ्या या घटनेत, शिवाजी उमाळे हा विद्यार्थी बाकावर बसलेला असताना त्याच्यावर प्लास्टरचे तुकडे कोसळले. डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे त्याला तातडीने जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले. या घटनेनंतर संपूर्ण शाळेत भीतीचे वातावरण पसरले असून, इतर विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चिंतेची लाट उसळली आहे. विशेष म्हणजे, ही शाळेची इमारत अवघ्या १० वर्षांपूर्वी बांधण्यात आली होती.
या दुर्घटनेनंतरचा व्हिडिओही समोर आला असून, त्यामध्ये वर्गात कोसळलेल्या स्लॅबच्या मोठ्या तुकड्यांचा खच दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या पाठीवरच्या बॅगांवरही सिमेंटचे तुकडे पडलेले स्पष्ट दिसतात.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अन्य जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. कोल्हापूरमधील शिये गावातील कन्या शाळेची इमारत पडझड झाल्याने विद्यार्थ्यांना दुसरीकडे हलवावे लागले होते. अनेक शाळांमध्ये छत गळत आहे, भिंतींना भेगा पडल्या आहेत, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत आणि स्वच्छतागृहांची स्थितीही अत्यंत खराब आहे.
वाशिममधील या दुर्घटनेने सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालकांकडून अशा शाळांची स्थिती लक्षात घेता तात्काळ दुरुस्ती आणि सुरक्षेची उपाययोजना करण्याची जोरदार मागणी होत आहे.