अंशतःअनुदानित शिक्षकांचे 11जुलै पासून आंदोलन
कोल्हापूर( प्रतिनिधी): शासनाने अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर मध्ये टप्पा वाढ देण्याची नुसतीच घोषणा केली आहे . याबाबत शासनाने आपला निर्णय बदलावा व आताच्या झालेल्या संचमान्यता (2023-24) मधील संचमान्यतेचा विचार करून शासनाने अनुदान द्यावे यासाठी 11जुलै 2024 पासून जोपर्यंत निर्णय बदलला जाणार नाही तोपर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य विनाअनुदान शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी सांगितले आहे .
महाराष्ट्र राज्यामध्ये गेली बरीच वर्षे हजारो शिक्षक टप्पा वाढ मिळण्याच्या आशेवर बसले आहेत . त्यातील बरेच शिक्षक विना वेतन सेवानिवृत्त झाले आहेत , तर काही शिक्षक सेवानिवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत .गेली बरीच वर्षे या शाळांना नियमितपणे टप्पा वाढ मिळत नसल्याने या शिक्षकांकडून वारंवार आंदोलने केली जात आहेत .सध्याच्या सरकारकडून शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर त्याचबरोबर अन्य मान्यवरांनी आंदोलन मागे घेण्याच्या सूचना देत या पावसाळी अधिवेशनामध्ये हमखास टप्पा वाढ देण्याचे आश्वासन दिले होते मात्र अधिवेशनामध्ये शिक्षण मंत्रींनी आपला शब्द नपाळल्याने नाराज शिक्षकांनी आंदोलनाचे अस्त्र पुन्हा उपसले आहे .
शासनाने आपली फसवणूक केली आहे ,शब्द देऊन शब्द पाळला नाही याचा जाहीर निषेध करत 11 जुलै 2024 पासून जोपर्यंत टप्पा वाढ होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत राज्यातील सर्व शाळांमध्ये काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय कृती समितीकडून घेण्यात आला आहे .