अकोला हादरले: 'ती' बकरीच्या पिल्लाला आणायला घरात गेली अन् त्या नराधमाने...

अकोला : बदलापूर येथील प्रकरणाचा विसर पडत नाही तोच, पुणे आणि कल्याण येथील घटनांनी महाराष्ट्र धास्तावला आहे. आणि अशातच अकोला जिल्ह्यातील पातुर पोलीस स्टेशन हद्दीमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ५५ वर्षीय नराधमाने नऊ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी आणि चिमुकली एकाच गावातील असून दोघांचीही घर ही जवळजवळ आहेत. चिमुकली ज्यांना आजोबा म्हणून हाक मारायची त्याच नराधमाकडून अतिप्रसंग करण्यात आला आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना घडली आहे.
नराधमाने उचलला संधीचा फायदा
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २६ डिसेंबर, गुरुवार रोजी सायंकाळी पातुर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावामधील नऊ वर्षीय चिमुकली आपल्याच घरासमोर बकरीच्या पिल्लांसोबत खेळत होती. खेळता खेळता बकरीचे पिल्लू धावत एका घरामध्ये शिरलं आणि त्याच बकरीच्या पिल्लाला परत आणण्यासाठी ही चिमुकली त्या घरामध्ये गेली असता, घरामध्ये राहणाऱ्या ५५ वर्षीय व्यक्तीने अमानुषपणे हा प्रकार केला आहे. आरोपीचे नाव भीमराव सुखदेव गवई असून आरोपीची पत्नी आणि त्याचा मुलगा हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. आणि इतर कोणीही नसल्याकारणाने त्याच संधीचा फायदा घेत आरोपीने चिमुकलीवर अत्याचार केला.
गावाजवळ असलेल्या जंगलामधून आरोपीला अटक
त्यानंतर ती मुलगी घरी गेल्यावर तिला वेदना सहन न झाल्याने तिने तिच्या आई-वडिलांना सांगितले पालकांकडून विचारपूस केल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला. कुटुंबीयांनी लगेच पातुर पोलीस स्टेशन मध्ये धाव घेऊन पोलिसांना सर्व घडलेला प्रकार सांगितल्यावर पातुर पोलिसांनी लगेच चक्र फिरवत गावाजवळून जवळच असलेल्या जंगलामधून आरोपीला ताब्यात घेतले. कलम ६४ एक, ६४ दोन आय, ६५ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २७ डिसेंबर रोजी आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.