अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा साखरपुडा ; कोण आहे होणारी सून?

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे चिरंजीव जय पवार यांचा आज साखरपुडा पार पडत आहे. पुण्यात आज सायंकाळी काही ठराविक मित्र, कुटुंबातील सदस्य आणि पक्षातील मोजक्या नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत जय पवार लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
साखरपुडा ठरल्यानंतर जय पवार आणि त्यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. 13 मार्च रोजी ही भेट झाली होती. या भेटी वेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार ह्या सुद्धा उपस्थित होत्या. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी स्वतः शरद पवार यांची भेट घेऊन साखरपुड्याचे निमंत्रण दिलं होतं.
कोण आहे होणारी सून
जय पवार यांच्या होणाऱ्या पत्नी ऋतुजा पाटील या सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे साताऱ्यातील फलटणचे प्रविण पाटील यांच्या कन्या आहेत. ऋतुजा पाटील या उच्चशिक्षित आहेत. जय पवार आणि ऋतुजा पाटील यांची गेल्या काही वर्षांपासून ओळख आहे. ऋतुजा पाटील यांची बहीण ही केसरी टूर्सच्या पाटील कुटुंबाच्या सूनबाई आहेत.
सुप्रिया सुळे साखरपुड्याला सहकुटुंब उपस्थित राहणार
जय पवार यांच्या आत्या सुप्रिया सुळे या संपूर्ण कुटुंबासह या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यासंदर्भात बारामतीमध्ये बोलताना त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मला सुनेत्रा वहिनींचा फोन आला होता. मला आमंत्रण दिलं आहे. अर्थातच आमंत्रण दिल्यावर जाणारच. सदानंद सुळे, सुप्रिया सुळे आणि रेवती सुळे जाणार आहेत. बाकीच्याचं मला माहीत नाही', असं म्हणत त्यांनी शरद पवार जाणार की नाही याबाबतीत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.