उद्धव ठाकरे यांची नीती ‘वापरा आणि फेकून द्या’,.. राजसाहेब जरा जपून ; योगेश कदमांचा राज ठाकरेंना सल्ला

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक प्रमुख चर्चा रंगली आहे – राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार का? याच पार्श्वभूमीवर शिवसेना गटांत वाद वाढताना दिसत आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर, त्यांच्या पुत्र व युवा नेते तथा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीही फेसबुकवर एक भावनिक, पण टीकेने भरलेली पोस्ट लिहित राज ठाकरे यांना ‘आपुलकीचा सल्ला’ दिला आहे.
योगेश कदम लिहितात की, "उद्धव ठाकरे यांची नीती ‘वापरा आणि फेकून द्या’ अशीच राहिलेली आहे. राजसाहेब, आपण मनापासून हात पुढे कराल, पण भविष्यात तुमचेच पाय खेचले जातील. म्हणून जरा जपून!"
तसेच त्यांनी असेही नमूद केले की, स्वार्थ पूर्ण झाल्यावर उद्धव ठाकरे यांना रक्ताची नातीही नकोशी वाटतात, आणि याचा अनुभव स्वतः राज ठाकरे यांना देखील आला आहे. त्यांनी शिवसेनेतील अनेक दिग्गज नेत्यांचे (जसे की नारायण राणे, मनोहर जोशी, एकनाथ शिंदे आदी) उदाहरण देत, उद्धव ठाकरेंकडून त्यांची उपेक्षा झाल्याचा आरोप केला.
दरम्यान, रामदास कदम यांनीही एका मुलाखतीत स्पष्ट केले की, "राज ठाकरे त्या काळात शिवसेनेचे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेना फुटली नसती. त्यांच्याकडे माणसं ओळखण्याची विलक्षण ताकद आहे. ते वाघासारखे नेते आहेत." याउलट, उद्धव ठाकरे यांना 'सुभाष देसाईसारखी शेळ्या-मेंढ्यांची माणसं' लागतात, अशी तीव्र टीका त्यांनी केली.
त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत सांगितले की, "उद्धव ठाकरेंच्या संमतीसाठी राज ठाकरे तयार होते, पण उद्धवच तयार नव्हते. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतचं समीकरण राजसाहेब कधीच स्वीकारणार नाहीत," असे वक्तव्य करत त्यांनी राज ठाकरेंना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगितला.