अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज करा - सचिन साळे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या महाविद्यालयांमध्ये शिकत असणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षामध्ये भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांचे अर्ज महाडिबीटी या ऑनलाईन प्रणालीवरुन भरण्यासाठी अर्ज भरण्यासाठीची सुविधा शासन स्तरारवरुन सुरु झालेली आहे. त्यामुळे सन 2025 - 26 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांनी तात्काळ महाडिबीटी प्रणालीवर ऑनलाईन अर्ज भरावेत, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे यांनी केले आहे.
सन 2025 - 26 या शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती आणि शिक्षण फी व इतर ऑनलाईन योजनांसाठी शासन स्तरावरुन https://mahadbtmahait.gov.in हे संकेतस्थळ 30 जून रोजीपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.
तसेच सद्यस्थितीमध्ये सन 2023 - 24 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज नुतनीकरणाची व सन 2024 - 25 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज भरण्याची अंतिम 31 जुलै असल्याने मोजकेच दिवस शिल्लक असल्याने उर्वरीत विद्यार्थ्यांनी तात्काळ महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरावेत. तसेच जिल्हयातील सर्व महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर प्रलंबित असणाऱ्या अर्जांची छाननी करुन परीपुर्ण असलेले अर्ज लवकरात लवकर ऑनलाईन प्रणालीतून सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाकडे वर्ग करण्याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही साळे यांनी केले आहे.