‘अमृत भारत योजने’ तून कोल्हापूर रेल्वे स्थानकाला ४३ कोटींचा निधी मंजूर
कोल्हापूर / माझा महाराष्ट्र, प्रतिनिधी
अमृत भारत योजनेतून कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास व्हावा, यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करत होते. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून केंद्र सरकारकडून यासाठी ४३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेतून कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होणार आहे. रविवार दिंनाक ६ ऑगस्ट रोजी पुनर्विकास कामांना प्रारंभ होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदुराणी दुबे यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकार्यांनी कोल्हापूर रेल्वे स्थानकाची पाहणी केली.
या भरघोस निधीतून कोल्हापूर रेल्वे स्थानकावर आकर्षक प्रवेशद्वार, पॅसेंजर लॉबी आणि वेटिंग रुमचे नूतनीकरण, प्लॅटफॉर्मचे मजबुतीकरण आणि सुशोभिकरण, सरकते जिने, फूट ओव्हर ब्रीज, लिफ्ट, दिव्यांग व्यक्तींना सुविधा अशी विविध विकासकामे होणार आहेत. मध्य रेल्वेच्या एकूण ३८ स्थानकांचा अमृत भारत योजनेत पुनर्विकासासाठी समावेश करण्यात आला आहे. या कामांचा शुभारंभ ६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. त्यामुळे रेल्वे विभागाकडून या कार्यक्रमाच्या नियोजनात कोणतीही उणीव राहू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे.
या शुभारंभ सोहळ्यासाठी कोल्हापुरातील मुख्य रेल्वे स्थानकावर तयारी सुरु करण्यात आली असून, सुमारे १ हजार लोक बसतील, असा भव्य शामियाना उभारण्यात येणार आहे. या तयारीची पाहणी इंदुराणी दुबे यांच्यासह वरिष्ठ अधिकार्यांनी करुन, स्थानिक प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्या.
या विकासामुळे रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक चांगल्या सुविधा मिळतील. तसेच नव्या मार्गावर रेल्वे गाड्या सुरु होण्यास मदत होईल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला. देशात रेल्वेचे जाळे विस्तारण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्नशील असल्याची माहिती खासदार महाडिक यांनी दिली. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सत्यजित कदम, समीर शेठ, शिवनाथ बियाणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.