’कृषी दिन व हेक्टरी सव्वाशे मे.टन ऊस उत्पादनता वाढ अभियान’ चा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

’कृषी दिन व हेक्टरी सव्वाशे मे.टन ऊस उत्पादनता वाढ अभियान’ चा  पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कृषी विभाग, प्रकल्प संचालक, आत्मा व कृषी विभाग, जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त “कृषी दिन व हेक्टरी 125 मे. टन ऊस उत्पादनता वाढ अभियान” या कार्यक्रमाचा शुभारंभ सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश अबिटकर यांच्या हस्ते 1 जुलै रोजी सकाळी 10 वाजता नवीन सभागृह, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे  होणार आहे.

1 जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस त्यांच्या सन्मानार्थ साजरा होतो. स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीला चालना देत राज्यात अनेक कृषी योजना राबविल्या आणि शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र कृषी विकासाच्या मार्गावर पुढे गेला, या दिवसाचे औचित्य साधून, जिल्हास्तरावर पिक स्पर्धा विजेते, उत्कृष्ट शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच, ऊस पिकामध्ये ए.आय. (AI) तंत्रज्ञानाचा वापर, तसेच उत्पादनवाढीसाठी आवश्यक उपाययोजना यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले आहे. 

कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, आत्माच्या प्रकल्प संचालक रक्षा शिंदे आणि जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकरयांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तंत्रज्ञान मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.