अलमट्टी धरणाच्या उंचीस इरिगेशन फेडरेशनचा विरोध : संजय घाटगे

म्हाकवे : आलमट्टी धरणाची उंची वाढवण्यास परवानगी मिळाल्यास कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातील काही भागाला पुराचा फटका बसणार आहे. येथील शेतकरी उद्ध्वस्त होतील. त्यामुळे आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास महाराष्ट्र इरिगेशन फेडरेशनचा कायमच विरोध राहील', अशी माहिती माजी आमदार संजय घाटगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केनवडे (ता. कागल) येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी बोलताना घाटगे म्हणाले, 'कर्नाटक शासन आलमट्टी धरणाची उंची पाच मीटरने वाढविण्यावर ठाम आहे. याबाबत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी केंद्रीय जलशक्तीमंत्री सी. आर. पाटील यांची भेट घेऊन उंची वाढविण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी द्यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत पुढच्या पंधरा दिवसांत केंद्रीयस्तरावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, 'आलमट्टी धरणाच्या फुगवट्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातून वाहणाऱ्या कृष्णा आणि उपनद्यांचे पाणी प्रवाहित होत नाही. त्यामुळे पुराचे पाणी अधिक काळ साचून राहते. आलमट्टी धरणामुळे कोल्हापूरमधील १२९ गावे पूरबाधित होतात. सध्या या धरणाची उंची ५१९.६ मीटर इतकी असून, ती ५२४.२६ मीटर पर्यंत वाढवण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नात आहे. या धरणाची उंची वाढविण्याचा निर्णय हा नदीकाठावरील शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या आलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाला विरोधच राहील.'