शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा ; राज ठाकरेंनी सरकारला दिला 'हा' इशारा

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला असून, त्यात ११ किल्ले महाराष्ट्रातील तर १ तामिळनाडूमधील जिंजी किल्ला आहे. या ऐतिहासिक निर्णयाने आनंद व्यक्त करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सजगतेचा इशारा दिला आहे.
राज ठाकरेंनी आपल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त करत म्हटलं, “युनेस्कोचा दर्जा मिळणं ही अभिमानाची बाब आहे, पण त्यानंतरची जबाबदारी अधिक मोठी असते. युनेस्कोने दिलेला दर्जा कायम राहावा यासाठी कडक निकष पाळावे लागतात. जगात अशा दोन ठिकाणी हा दर्जा मागे घेण्यात आला आहे. ओमानमधील आवरिक्स अभयारण्य आणि जर्मनीतील ड्रेस्डन व्हॅली. त्यामुळे सरकारने केवळ उत्सव न साजरा करता योग्य ती पावले उचलावीत असंही राज ठाकरे म्हणाले.
अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईची मागणी
या किल्ल्यांवर झालेली सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवावी. त्यात जात-धर्म पाहू नये. हे ठिकाण आपल्या सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहेत. संवर्धनात कोणतीही तडजोड होऊ नये, असं ठाकरेंनी स्पष्टपणे सांगितलं.
संवर्धन आणि पर्यटनासाठी भक्कम पायाभूत सुविधा हवीत
राज ठाकरे यांनी युनेस्को दर्जामुळे या ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी आता निधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. “इतके दिवस या किल्ल्यांकडे दुर्लक्ष झालं. पण आता त्यांचे नीट संवर्धन, नूतनीकरण, आणि पर्यटनविकासासाठी पायाभूत सुविधा उभारल्या तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. हे आम्ही अनेक वर्षांपासून सांगत आलो आहोत,” असंही ते म्हणाले.
शिवरायांचा वारसा – महाराष्ट्र ते तामिळनाडू
या १२ किल्ल्यांच्या यादीत समाविष्ट जिंजी किल्ल्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले, “हा निर्णय महाराष्ट्र आणि तामिळनाडू यांच्यातील ऐतिहासिक, सांस्कृतिक संबंध किती जुने आणि बळकट आहेत, याची साक्ष देतो. स्वराज्याचा विचार दक्षिणेपर्यंत पोहोचल्याचा हा पुरावा आहे.”