अजितदादा काकांना धक्का देण्याच्या तयारीत ? 'हा' आमदार दिसला शिवनेरीवर

पुणे: छत्रपती शिवाजी महाराजांची 395 वी जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थान म्हणजेच पुण्यातील किल्ले शिवनेरीवर शिवजयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी या सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपस्थित होते. या सोहळ्यात एक चेहरा असा दिसला ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा चेहरा अजित पवार यांच्यासोबत पाहून राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे. ज्या चेहऱ्याची इतकी चर्चा होत आहे ते म्हणजे शरद पवारांचे आमदार बापू पठारे.
शरद पवारांचे पुण्यातील एकमेव आमदार बापू पठारे आज शिवनेरी किल्ल्यावरील शिवजयंती सोहळ्यात दिसून आले. इतकंच नाही तर ते शासकीय कार्यक्रमात मंचावरही दिसून आले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
शिवनेरीवरील शासकीय कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बापू पठारे यांनीही या कार्यक्रमात हजेरी लावली. बापू पठारे हे अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु असतानाच आज ते उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत एका व्यासपीठावर दिसून आल्याने ते खरंच शरद पवारांची साथ सोडणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंचावर ते अजित पवार यांच्या मागे बसलेले दिसून आले. पण त्यांनी मतदारसंघातील कामा निमित्त अजित पवार यांची भेट घेतल्याचं स्पष्टीकरण दिलं. आता खरंच बापू पठारे काकांची साथ सोडून अजित पवार यांच्या गोटात दाखल होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.