“आनंद दिघेंनी काय शिकवलं ते आम्हाला शिकवू नका”, संजय राऊतांचा शंभूराज देसाईंवर घणाघात

“आनंद दिघेंनी काय शिकवलं ते आम्हाला शिकवू नका”, संजय राऊतांचा शंभूराज देसाईंवर घणाघात

मुंबई: “आनंद दिघेंनी काय शिकवण दिली, हे आम्हालाच शिकवायला नको,” अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शंभूराज देसाईंनी “आनंद दिघे असताना संजय राऊत कुठे होते?” अशी टीका केली होती. यावर उत्तर देताना राऊत म्हणाले, “काँग्रेसमधून आलेले देसाई आम्हाला बाळासाहेब ठाकरे किंवा आनंद दिघेंबद्दल शिकवतील? त्यांनी आधी इतिहास वाचावा.”

राऊत पुढे म्हणाले, “शंभूराज देसाईंनी ज्या ‘गद्दारांना धडा शिकवणार’ अशा प्रकरणाची चर्चा केली, त्यावर खटला चालला होता आणि त्या खटल्यातील माझी भूमिका काय होती हे समजून घेणं त्यांच्यासारख्या पोकळ लोकांनी आवश्यक आहे. अमित शहांनी देसाईंना फडणवीसांची चाकरी करायची तंबी दिली आहे. त्यामुळे ते ‘भांडी घासा, गुलामी करा पण बाहेर पडू नका’ या पातळीवर आले आहेत.”

याशिवाय, राऊतांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही निशाणा साधला. “बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने एक बनावट शिवसेना तयार करण्यात आली आहे. अमित शहांनी महाराष्ट्रात बनावट संघटना निर्माण करून तिचं नाव ‘शिवसेना’ ठेवलं. त्यामुळे त्यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्याशी काही संबंध राहात नाही,” असं राऊत म्हणाले.

संजय राऊतांनी ‘धर्मवीर’ वेबसीरिज आहे. ते त्याचे पाच पंचवीस भाग काढत राहतील. “मी तो चित्रपट पाहिलेला नाही, पण लोक म्हणतात की त्यात आनंद दिघेंची बनावट प्रतिमा तयार केली गेली आहे. आम्ही त्यांच्याशी खूप जवळून संबंधित होतो, त्यामुळे या लोकांनी आम्हाला धर्मवीर शिकवू नये. आमचे राजन विचारे हे त्यांच्यासोबत अधिक वेळ घालवलेले आहेत,” असं त्यांनी स्पष्ट केलं.

शेवटी, संजय राऊतांनी भाजप नेत्यांना उद्देशून म्हटलं की, “आम्ही जर अमित शहांवर टीका केली असती, तर त्यांना राग येणं समजण्यासारखं आहे. पण बाळासाहेब ठाकरे हे आमचे नेते होते आणि उद्धव ठाकरे यांचे वडील होते, त्यामुळे भाजप किंवा त्यांच्या नेत्यांचा याच्याशी काही संबंध नाही.”