आनंददायी अभ्यासक्रम व मिशन उत्कर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा संपन्न
कागल (प्रतिनिधि) : आनंददायी अभ्यासक्रम, मिशन उत्कर्ष अंतर्गत दिनदर्शिका प्रकाशन सोहळा नाम. हसन मुश्रीफ, पालकमंत्री, कोल्हापूर यांच्या हस्ते मटकरी मंगल कार्यालय, कागल येथे संपन्न झाला.
विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्तन व जबाबदारीबाबत जागरुकता निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या हेतूने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग कडील शासन निर्णय दि. २९ जून २०२२ नुसार राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय परिपाठात Happiness Curriculum आनंददायी अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वेगवेगळ्या स्तरांतील विद्यार्थ्यांना विविध अध्यापन पद्धतींचा वापर करून कृतीद्वारे शिक्षण, स्वानुभवातून शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, गरजाधिष्ठीत शिक्षण आणि समन्वयातून शिक्षण देण्यासाठी रचनावादी कार्यक्रम हाती घेणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांना केवळ वर्तनवादी आणि पारंपरिक पद्धतीने न शिकवता त्यांना विविध कृतींच्याद्वारे आनंददायी पद्धतीने शिकता आले तर विद्यार्थी गतीने शिकतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या कृती, उपक्रम यांच्या नियोजनबद्ध मांडणीमुळे विद्यार्थ्यांत तर्कसंगत विचार, सहानुभूती, करुणा, साहस, लवचिकता, वैज्ञानिकता, रचनात्मक कल्पनाशक्ती, नैतिक मूल्ये या घटकांची रुजवण करणेही सुलभ जाते.
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या २९ जून, २०२२ च्या शासन परिपत्रकानुसार जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्यामार्फत आनंददायी अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेला आहे. शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नवोपक्रमशील शिक्षक यांच्या अथक परिश्रमातून ही अभिनव पुस्तिका साकारली आहे. सजगता, कथा, कृती, अभिव्यक्ती / छंद अशा चार घटकांच्या समावेशाने 'आनंददायी अभ्यासक्रम विकसित करण्यात आलेला आहे. पाचशेहून अधिक विविधांगी कृतींची मांडणी करून निर्मिती मंडळाने कौतुकास्पद कार्य केलेले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खाजगी अनुदानित संस्थांच्या मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंददायी अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. सदर पुस्तिका त्यासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शी ठरणारी आहे. सर्व शिक्षक आनंददायी अभ्यासक्रमातील कृतींची शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करून शैक्षणिक गुणवत्ता विकासात सक्रिय होतील.
मिशन उत्कर्ष दिनदर्शिका कोल्हापूर जिल्हा परिषद अंतर्गत सन २०२४-२०२५ या वर्षामध्ये शिक्षण विभाग देशात प्रथमस्थानी येण्यासाठी प्रयत्नशील आहे. या अंतर्गत मिशन उत्कर्ष दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्व शाळांमध्ये विविध उपक्रम राबविणे बाबत आवाहन व जनजागृती करणेचा मानस आहे. मिशन उत्कर्ष दिनदर्शिकेचा उद्देश विद्यार्थीच्या संपादणूक पातळीची विषयनिहाय पडताळणी करून वाढ करणे व मार्गदर्शन करणे, PGI व NAS निर्देशांक मध्ये अधिक सुधारणा होण्यासाठी विविध उपक्रम राबवणे व PGI गुणांकन मध्ये वाढ करून जिल्हा देशामध्ये प्रथम स्थानावर आणणे. याप्रमाणे उद्देश यशस्वी करण्यासाठी सर्व शाळा मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी या सर्वांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे. यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करून जिल्हा देशात प्रथम क्रमांकावर येण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर यांनी केले.