कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यावर विविध क्षेत्रांतील मान्यवर, कार्यकर्ते आणि पदाधिकार्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव
कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूर दक्षिणचे आमदार अमल महाडिक यांच्यावर आज विविध क्षेत्रांतील मान्यवर, तसंच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकार्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. याचबरोबर आमदार महाडिक यांच्या विजयासाठी अनवानी फिरण्याची प्रतिज्ञा केलेल्या चौघा कार्यकर्त्यांचाही सत्कार करण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात हायव्होल्टेज लढत झाली. काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील आणि भाजप महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्यात झालेल्या थेट लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. या लढतीत आमदार अमल महाडिक यांनी निर्विवाद विजय संपादन केल.
आज त्यांनी नागाळा पार्कातील पक्ष कार्यालयाला भेट दिली. तत्पूर्वी कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनही केलं. पक्ष कार्यालयात सकाळी 09 ते 2 या वेळेत त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी तसंच नागरिकांकडून शुभेच्छा आणि अभिनंदनाचा स्वीकार केला. जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक राजसिंह शेळके, विजयसिंह सूर्यवंशी, विजय खाडे, किरण नकाते, अशोक देसाई, गायत्री राऊत, रुपाराणी निकम यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार अमल महाडिक आणि सौ. शौमिका महाडिक यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. अमल महाडिक हे विजयी झाल्यावरच पादत्राणे घालू, अशी प्रतिज्ञा या मतदारसंघातील साईनाथ मांडरेकर, सागर वाडकर, हर्षद कुसाळे, बिरू डावरे या चौघा कार्यकर्त्यांनी केली होती. आज या कार्यकर्त्यांचा आमदार अमल महाडिक यांनी पोशाख देऊन सत्कार केला. तसंच त्यांना पादत्राणंही दिली. कार्यकर्त्यांचं आपल्यावरील हे प्रेम पाहून आमदार महाडिक आणि सौ. शौमिका महाडिक भारावून गेल्या.