कुस्तीक्षेत्रातील भिष्माचार्य "बाळासाहेब गायकवाड"

कोल्हापूर प्रतिनिधी : कोल्हापूरच्या कुस्ती परंपरेत अढळ स्थान असलेल्या आणि संपूर्ण आयुष्य कुस्ती क्षेत्रासाठी समर्पित करणाऱ्या बाळासाहेब राजाराम गायकवाड यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण रविवारी 9 फेब्रुवारी रोजी मोतीबाग तालीममध्ये होत आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सोहळा होत असून, त्याच वेळी नवीन आधुनिक मल्ल वसतिगृहाचे उद्घाटनही करण्यात येणार आहे.
कुस्तीच्या विकासासाठी अखेरचा श्वास घेतला!
बाळासाहेब गायकवाड म्हणजे कडक शिस्त, अतूट निष्ठा आणि संपूर्ण जीवन कुस्तीला अर्पण करणारे व्यक्तिमत्त्व! त्यांनी स्वतः अविवाहित राहून मोतीबाग तालीम आणि कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाच्या माध्यमातून कुस्तीगिरांसाठी संपूर्ण जीवन वाहिले. अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू घडविणाऱ्या या व्यक्तीमत्त्वाला कुस्तीक्षेत्रातील "भिष्माचार्य" मानले जाते.
मोतीबाग तालीम – कुस्तीचा पंढरपूर
150 वर्षांहून अधिक काळाची परंपरा असलेल्या मोतीबाग तालीम आखाड्याच्या विकासात बाळासाहेब गायकवाड यांचे योगदान अमूल्य आहे. छत्रपती शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या या तालमीत त्यांनी कुस्तीच्या भरभराटीसाठी सर्वस्व समर्पित केले. कुस्तीगिरांना राहण्याची उत्तम सोय, जागतिक दर्जाच्या सुविधा, आधुनिक प्रशिक्षण केंद्र, आणि केंद्र सरकारच्या सहाय्याने विशेष खेळ साहित्य मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा होता.
कुस्ती क्षेत्रात क्रांती घडवणारे योगदान
कोल्हापूर जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची स्थापना करून कुस्तीला संघटित स्वरूप दिले. कुस्तीगिरांसाठी निवासी वसतिगृह बांधले, आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या. जगातील प्रसिद्ध कुस्तीगिरांचे ऐतिहासिक फोटो संग्रहालय उभारले. देशभरातील नामांकित पैलवानांना कोल्हापुरात आणून स्थानिक कुस्तीगिरांना प्रशिक्षित केले.
स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) द्वारे दोन प्रशिक्षण केंद्रे मंजूर करवून घेतली. "युवराज पाटील" सारख्या जागतिक दर्जाच्या पैलवानाला घडविले, ज्याने देशविदेशात कोल्हापूरचे नाव उंचावले.
बाळासाहेब गायकवाड हे केवळ प्रशिक्षक नव्हते, तर एक आदर्श होते. "कणभर कृती, शब्दांचा उपयोग नाही" या तत्त्वावर त्यांनी आयुष्यभर जगले. त्यांचे प्रत्येक निर्णय कुस्तीगिरांच्या कल्याणासाठी होते. त्यांचा शब्द कुस्ती क्षेत्रात अंतिम मानला जाई.
त्यांच्या अर्धपुतळ्याच्या अनावरणाच्या निमित्ताने त्यांचे अमूल्य योगदान पुन्हा उजळून निघणार आहे. हा पुतळा केवळ सन्मान नाही, तर भविष्यातील कुस्तीपटूंना प्रेरणा देणारा साक्षीदार ठरेल. कोल्हापूरच्या मातीतील कुस्ती संस्कृतीला त्यांचा वारसा पुढे नेण्याची प्रेरणा मिळेल.