डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींग विद्यार्थ्यांचे दैदिप्यमान यश

इचलकरंजी प्रतिनिधी  : मध्यप्रदेश येथील ज्ञानगंगा इन्स्टिटयूट,जबलपूर येथे संपन्न झालेल्या ’आयडीई बुटकॅम्प’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत डीकेटीईच्या इटीसी विभागाचा तृतीय क्रमांकाचे बक्षिस प्राप्त झाले आहे. या स्पर्धेमध्ये डीकेटीईच्या इटीसी इंजिनिअरींगमधील विभागातील विद्यार्थी पूर्वा कुलकर्णी, सम्राज्ञी माने, अद्वैत कुलकर्णी, तनिष कुलकर्णी व अवधूत महाजन या पाच विद्यार्थ्यांनी डॉ. जे.पी. खरात यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली गाईंच्या आरोग्यासाठी स्मार्ट कॉलर या प्रकल्पासाठी तृतीय क्रमांकाचे बक्षिस मिळविले आहे.

या बुटकॅम्पचे आयोजन इनोव्हेशन सेल (एमआयसी) आणि एआयसीटीई दिल्ली यांच्या वतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उद्योजकता विकसीत करणे आणि नाविन्यपूर्ण कल्पनांना व्यावसायिक स्वरुप देणे हा या बुटकॅम्पचा मुख्य उददेश होता. यास अनुसरुन डीकेटीईच्या विद्यार्थ्यांनी आयोटीचा वापर करुन गाईंसाठी स्मार्ट कॉलर हे उपकरण विकसीत केले आहे. या उपकरणांमध्ये वेगवेगळे सेन्सर्स वापरुन गायींच्या हालचाली, तापमान, अहार, आणि इतर शारिरीक क्रियांची नोंद ठेवली जाते. हया नोंद केलेल्या माहितीचे पृथकरण करुन शेतक-यांना गायींच्या आरोग्यविषयी माहिती मोबाईल ऍपद्वारे दिली जाते यामुळे गायींवर वेळीच उपचार करणे शक्य होते. या अधुनिक टेक्नॉलॉजीमुळे गायींचे आरोग्य सुधारुन दूध उत्पादन वाढवण्यास मदत होते.

या स्पर्धेत देशभरातील १०० हून अधिक अभियांत्रिकी कॉलेजमधील ६०० हून अधिक ग्रुपस नी सहभाग घेतला होता. यामध्ये डीकेटीईतील इटीसी इंजिनिअरींगमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले. सदर स्पर्धेमध्ये तीन फे-या होत्या. प्रत्येक फेरीमध्ये विचारल्या जाणा-या तांत्रिक प्रश्‍नांना डीकेटीईचे विद्यार्थी गुणवत्ता सिध्द करीत होते यामध्ये बौध्दीक, तांत्रिक, अत्याधुनिक तंत्रज्ञान, जनरल नॉलेज व मुल्यांकन या सर्व स्तरावर डीकेटीईचे विद्यार्थी पात्र ठरुन त्यांना तृतीय क्रमांकाने गौरविण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सचिव डॉ सपना आवाडे,कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व विश्‍वस्त यांनी पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेच्या संचालिका प्रा.डॉ.एल.एस.अडमुठे, इटीसी विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.