केआयटी कॉलेजचा स्थापना दिवस उत्साहात संपन्न
कोल्हापूर (प्रतिनिधी): येथील केआयटी अभियांत्रिकी (स्वायत्त) महाविद्यालयाचा ४२ वा स्थापना दिवस आज गुरुवार ४ जुलै २०२४ रोजी अत्यंत उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले. संस्थेची शैक्षणिक तसेच अन्य क्षेत्रात सुरू असलेली प्रगतीचा आढावा त्यांनी सर्वांसमक्ष ठेवला. अभियांत्रिकी शिक्षणातील एक दर्जेदार संस्था म्हणून केआयटी भविष्याचा वेध घेत वर्तमानामध्ये जे प्रयत्न करत आहे अशा सर्व प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अभ्यासक्रमात झालेला समावेश हा अत्यंत महत्त्वाचा असून अत्यंत दर्जेदार कंपन्यांचे केआयटी मध्ये येणे व त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजचे जॉब मिळणे हे आपल्या दर्जात्मक शिक्षणाचेच प्रतीक असल्याचे मत डॉ. वनरोट्टी यांनी व्यक्त केले. भविष्यामध्ये परदेशी भाषा शिक्षण तसेच रिसर्च च्या माध्यमातून एन.आय.आर.एफ रँकिंग मध्ये सुद्धा केआयटी चे नाव आपण बाबत मोठे करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमांमध्ये संस्थेचे सचिव दीपक चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. गेल्या वर्षभरात झालेल्या शैक्षणिक प्रगती बाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर भविष्यात अजून मोठ्या प्रमाणात विकसित होणार असल्याबाबत त्यांनी सुतोवाच केले. भविष्यात केआयटी हे ‘रिसर्च हब’ म्हणून ओळखला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संस्थेचे ज्येष्ठ विश्वस्त भरत पाटील यांनी आधुनिक अभियांत्रिकी शिक्षणाच्या माध्यमातून कृषी क्षेत्र, आरोग्य क्षेत्र या क्षेत्रातील अभियांत्रिकीची उपयोगिता आपण सिद्ध केली पाहिजे व त्यातून वैशिष्ट्यपूर्ण मनुष्यबळ निर्मिती करून या क्षेत्राला सुद्धा आपला उपयोग करून दिला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
संस्थेचे अध्यक्ष श्री सुनील कुलकर्णी यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी संस्था प्रामुख्याने मूल्याधारित असून प्राध्यापकांच्या व अन्य शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक सक्रीय योगदानामुळे आपण एवढी मोठी प्रगती करू शकलो अशा भावना व्यक्त केल्या. प्रत्येक दिवशी छोट्या छोट्या कृतींमधून स्वतःचा विकास करताना संस्थेच्या विकासातही आपण भर घालत असतो त्यामुळे प्रत्येक घटकाने आपल्या संस्थेप्रती योगदानाचा सातत्याने कृतीशील विचार करावा असे सर्वांना आवाहन केले.
संस्थेचे कर्मचारी आर.टी.शिंदे, प्रा. अमर टिकोळे,डॉ.वाय.एम.पाटील यांनी संस्थेबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमामध्ये केआयटी च्या वार्षिक अंकाचे विमोचन उपस्थित मान्यवरांच्या च्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.जितेंद्र भाट यांनी केले तर सूत्रसंचालन डॉ दीप्ती कुलकर्णी यांनी केले.या कार्यक्रमास संस्थेचे रजिस्ट्रार डॉ.एम.एम.मुजुमदार,सर्व अधिष्ठाता,सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.