कोजागिरी निमित्य गोकुळची १८ लाख ६५ हजार लिटर्स उच्चांकी दूध विक्री

कोजागिरी निमित्य गोकुळची १८ लाख ६५ हजार लिटर्स उच्चांकी दूध विक्री

कोल्‍हापूर (प्रतिनिधी) :  गोकुळने कोजागिरी पौर्णिमादिनी दूध विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून यादिवशी १८ लाख ६५ हजार लिटर्स दुधाची विक्रमी विक्री झाली. या दूध विक्री निमित्त गोकुळ कर्मचाऱ्यांच्यावतीने संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचा सत्कार प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी चेअरमन डोंगळे यांनी भविष्यात प्रतिदिन २० लाख लिटर दूध विक्रीचे तसेच दिवाळी सणामध्ये तूप, श्रीखंड, बासुंदी, पनीर, लोणी, पेढा यासारखे उपपदार्थ हि मोठ्या प्रमाणावर विक्री करण्‍याचे उद्दिष्‍ट असून ते दूध उत्‍पादक व ग्राहकांच्‍या विश्‍वासाहर्ततेवर तसेच कर्मचाऱ्यांच्या सहकार्यातून साध्‍य करू असा विश्वास व्यक्त केला.

          पुढे बोलताना चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळने आपल्या उच्चतम गुणवत्तेच्या जोरावर ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. त्‍यामुळेच गोकुळच्‍या दररोजच्‍या दूध संकलनात तसेच विक्रीत सातत्‍याने वाढ होत आहे.आज बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गोकुळने दूध विक्रीचा नवीन उच्‍चांक प्रस्थापित करताना १८ लाख ६४ हजार ७५९ लिटर्स इतकी दूध विक्री एक दिवसात केलेली आहे. गतवर्षी कोजागिरी पौर्णिमेच्‍या दिवशी १७ लाख ८०  हजार ९८५ लिटर्स इतकी दूध विक्री गोकुळने एक दिवसात केलेली होती. गतवर्षीच्‍या तुलनेत गोकुळच्‍या विक्रीत जवळजवळ ८३ हजार ७७४ लिटर्स ने वाढ झालेली आहे. दूध विक्रीमध्ये नवनवीन मानदंड प्रस्थापित करताना गोकुळने नेहमीच चढता आलेख ठेवलेला आहे. या यशामध्‍ये गोकुळचे दूध उत्‍पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक व कर्मचारी, वाहतूक ठेकेदार यांचे योगदान मोलाचे असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले व गोकुळ परिवाराच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्‍छा दिल्या.

          याप्रसंगी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, वरिष्ठ अधिकारी डॉ.एम.पी.पाटील, बाजीराव मुडकशिवाले, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम तसेच संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.