शरद पवार कागल मध्ये एकदाच येवून गेले तो ट्रेलर होता- आ. जयंत पाटील

शरद पवार कागल मध्ये एकदाच येवून गेले तो ट्रेलर होता- आ. जयंत पाटील

गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कागल मतदारसंघातील एक नेते राष्ट्रवादी पक्ष सोडून गेल्यानंतर शरद पवार हे फक्त एकदाच या मतदारसंघात येऊन गेले. तो ट्रेलर होता.खरा सिनेमा २० तारखेच्या आधी दिसेल. केवळ ट्रेलरमुळे या नेत्याचा तोल ढळू लागला आहे. तोल गेल्याने आणि समोर पराभव दिसू लागल्याने त्यांच्या तोंडून चुकीचे शब्द बाहेर येत आहेत',अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव न घेता केली.

राष्ट्रवादीतर्फे (शरद पवार गट) येथे शिवस्वराज्य यात्रेची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. 

 दरम्यान,सभेतील प्रत्येक वक्त्यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना टार्गेट केले. 

जयंत पाटील म्हणाले, 'गद्दारी केलेल्यांना महाराष्ट्र प्रायश्चित देतोच. दोन मराठा नेत्यांचे पक्ष फोडलेल्यांना आणि आपापले पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांचे विसर्जन करून त्यांना प्रायश्चित देण्यासाठी निवडणूक आयोगाने २० नोव्हेंबरचा मुहूर्त शोधला आहे. हा मुहूर्त जनतेने वाया घालवू नये.समोरच्यांचे पूर्वीचे गुरू आता समरजितसिंह घाटगेंच्या मागे उभे आहेत. हीच घाटगेंची मोठी ताकद आहे. मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. त्याला समरजित सिंह घाटगे हेच एकमेव उत्तर आहे. तोल गेल्यानेच आतापर्यंत या नेत्याने घाटगेंना दोन पदव्या दिल्या आहेत. त्यातच घाटगेंनी निवडणूक जिंकली आहे.'

यावेळी बोलताना समरजितसिंह घाटगे म्हणाले,'गेली पाच वर्षे गडहिंग्लज भागातील जनतेचा विश्वास कमावण्यासाठी काम केले आहे. पुढील पाच वर्षे काय काम करायचे याचे धोरण नसल्यानेच मुश्रीफांच्या तोंडून शिव्या बाहेर येताहेत. मंत्रिपद असतानाही त्यांनी अबिओहोळ व हद्दवाढ का केली नाही? कागल व गडहिंग्लजमधील अनेक वसाहतीतील घरांचे प्रॉपर्टी कार्ड नाहीत. त्यांना आता हक्काचे घर देणे, औद्योगिक वसाहतीत उद्योग आणणे, फुटबॉल खेळाडूंना सुविधा देणे हे माझे व्हीजन आहे. विरोधकांच्या टीकेला हे व्हीजनच उत्तर आहे. यामुळे जनतेने परिवर्तनाची सुरुवात कागलमधून करावी.'

डॉ नंदाताई बाभुळकर कुपेकर म्हणाल्या या मतदारसंघावर दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांनी शरद पवार साहेबांशी शेवटच्या श्वासापर्यत तब्बल पन्नास वर्षे एकनिष्ट राहून सर्वांना निष्ठेची शिकवणकृतीतून दिली. येत्या निवडणुकीत गडहिंग्लज कडगाव कौलगे उत्तूर विभागातील जनतेने शरद पवारांचा आशीर्वाद असलेल्या समरजितसिंह घाटगे यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांना आदरांजली कृतीतून वाहू या.

लाडका कॉन्ट्रॅक्टर योजना...

खासदार कोल्हे म्हणाले, 'निष्ठेचे प्रतीक असलेल्या सरसेनापती प्रतापराव गुर्जरांच्या पावन भूमीचा अभिमान असेल, तर पक्षाशी व नेत्याशी प्रतारणा केलेल्यांचा तितकाच तिटकारा करा. हा तिटकारा दाखविण्याचा मुहूर्त ठरला आहे. उपभोगशून्य स्वामीत्वचा अर्थ काहींना न कळणाऱ्यांच्या तोंडून अपशब्द बाहेर येत आहेत. तो त्यांच्या नजरेचा दोष आहे. घाटगेंची मनाची श्रीमंती पाहून त्यांना  साथ द्यावी.'

मुश्रीफ साहेब, हे वागणं बरं न्हवं...

शेख म्हणाले, 'गरिबांच्या कल्याणासाठी काम केल्याचा आव मुश्रीफ आणत आहेत. तसे असते तर ते पवारांना सोडून गेले नसते. मुश्रीफ यांनी रोजगार हमीवर काम करून पैसे मिळविलेले नाहीत, तर पवारांनी दिलेल्या पदांच्या माध्यमातून ते मिळवलेत. म्हणून मुश्रीफसाहेब, तुमचं हे वागणं बरं न्हवं.'

यावेळी मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, व्ही. बी. पाटील, डॉ. नंदाताई बाभूळकर, अमर चव्हाण यांची भाषणे झाली. 

 शिवानंद माळी यांनी स्वागत केले. प्रा. सुभाष कोरे यांनी सूत्रसंचालन केले. युवराज बरगे यांनी आभार मानले. यावेळी गडहिंग्लज व कागल तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.