गट क च्या शासन निर्णयापूर्वी संघटनांसोबत बैठक घ्या-आ. सतेज पाटील

गट क च्या शासन निर्णयापूर्वी संघटनांसोबत बैठक घ्या-आ. सतेज पाटील

कोल्हापुर (प्रतिनिधी) नवीन क्रीडा धोरणामध्ये "गट क" मधील नियुक्तीच्या प्रारूपसंदर्भात क्रीडा संघटनांचा आक्षेप आहे. याबाबत खेळाडूंच्याही तीव्र भावना आहेत. हे लक्षात घेऊन शासन निर्णय जाहीर करण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी या आठवड्यात संघटनांसोबत बैठक घ्यावी, अशी मागणी विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी विधान परिषदेत केली.

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असून, यात आमदार पाटील यांनी खेळाडूंच्या नियुक्तीसंदर्भात विलंब होत असून, नियुक्ती मिळत नसल्याने खेळाडू मिळालेले मेडल्स परत करण्याच्या तयारीत असल्याचेही निदर्शनास आणून दिले. आमदार पाटील म्हणाले, २०१८ मध्ये अर्ज केलेल्या खेळाडूंच्या नियुक्ती अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे नवीन क्रीडा धोरणामध्ये नियुक्तीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी कालमर्यादा निश्चित करावी. शिवाय, नवीन क्रीडा धोरणामध्ये "गट क" मधील नियुक्तीच्या प्रारूप संदर्भात क्रीडा संघटनांचा आक्षेप आहे. याबाबत खेळाडूंच्याही तीव्र भावना आहेत. हे लक्षात घेऊन शासन निर्णय जाहीर करण्यापूर्वी क्रीडामंत्र्यांनी या आठवड्यात संघटनांसोबत बैठक घ्यावी. यावेळी क्रीडा मंत्री यांच्यावतीने मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शासनाची क्रीडा संघटनांसोबत चर्चा सुरू आहे. त्यांना सरकारसोबत चर्चेला बोलवू, अशी ग्वाही दिली.