चाटे शिक्षण समुहाच्या गुणवंतांचे यश हे प्रेरणादायी - प्रा. गोपीचंद चाटे

कोल्हापूर (प्रतिनिधि) : चाटे शिक्षण समुहामधील गुणवंतांनी मिळविलेले यश हे योग्य मार्गदर्शन, सातत्य, नियोजन आणि कठोर परिश्रम याचे फलित आहे. चाटे पॅटर्न म्हणजेच यश हे समीकरण सन-२०२४ च्या निकालामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा खरे करून दाखविले आहे. विद्यार्थ्यांनी मिळविलेले यश हे फक्त त्यांचे वैयक्तिक यश नसून त्यासाठी पालक आणि शिक्षक यांनी दिलेले प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले परिश्रम यामुळे मिळालेले आहे. या यशामुळे गुणवंतांचे भवितव्य उज्ज्वल होईलच परंतु त्यासोबतच सध्या शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही या यशामुळे प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळेल, असे उद्गार चाटे शिक्षण समुहाचे अध्यक्ष प्रा. गोपीचंद चाटे यांनी काढले.
इयत्ता दहावी, जेईई मेन्स व अॅडव्हॉन्स, नीट आणि सीईटी या परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार डॉ. व्ही. टी. पाटील सभागृह, ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केला होता. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सत्कार शाल, पुष्पगुच्छ आणि स्कॉलरशिप चेक या स्वरूपात करण्यात आला. या प्रसंगी शुभेच्छापर मनोगतात प्रा. डॉ. भारत खराटे यांनी आजचा गुणवंतांचा सत्कार हा विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या अथक परिश्रमाचे फळ असून या पुढेही नवीन शैक्षणिक धोरणानुसार गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्यासाठी चाटे शिक्षण समूह नेहमीच तत्पर असेल असे सांगितले.
कार्यक्रमासाठी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना फेटे बांधून सभागृहात आणले यावेळी प्रचंड उत्साह दिसून येत होता. विद्यार्थ्यांचा सत्कार होताना त्यांच्या पालकांच्या चेहर्यावरील समाधानाचे भाव कार्यक्रमाची उंची वाढवणारे होते. कार्यक्रमासाठी प्रा. फुलचंद चाटे, युनियन बँक ऑफ इंडियाचे विभागीय महाव्यवस्थापक संजयकुमार मंडल, चाटे शिक्षण समुहाचे पदाधिकारी, सर्व गुणवंत विद्यार्थी आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रज्ञा गिरी आणि आभार प्रा.सर्जेराव राऊत यांनी मानले.