'गुलकंद' च्या निमित्ताने सई - समीरची हटके जोडी पहिल्यांदाच पडद्यावर, मनोरंजनाची उत्तम मेजवानी

Gulkand Movie: एव्हरेस्ट एंटरटेनमेंट आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित 'गुलकंद' हा फॅमकॉम चित्रपटात ढवळे आणि माने या दोन जोडप्यांच्या नात्यातील गंमतीदार क्षण, विनोदी संवाद, नोकझोक अशी मनोरंजनाची उत्तम मेजवानी पाहायला मिळेल. चित्रपटात सई ताम्हणकर आणि समीर चौघुले यांच्यासह प्रसाद ओक आणि ईशा डे या जोडीचा ही अप्रतिम अभिनय पाहायला मिळणार आहे.
नुकताच 'गुलकंद' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. या टीझरमध्ये सई आणि समीर यांच्यातील गोड संवाद आणि त्यांचं प्रेमळ नातं पाहायला मिळालं, ज्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा अधिक वाढल्या आहेत. दोघांचं पहिल्यांदाच एकत्र काम करणं, हे मराठी चित्रपटसृष्टीसाठी खास ठरणार आहे.
पहिल्यांदाच सई ताम्हणकर आणि समीर चौघुले ही हटके जोडी चित्रपटात एकत्र झळकणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. समीर चौघुलेच्या भन्नाट विनोदी अंदाजासोबतच सई ताम्हणकरच्या अभिनयातील सहजता आणि वैविध्यता यांचा उत्तम मिलाप पाहायला मिळेल. सचिन गोस्वामी दिग्दर्शित आणि सचिन मोटे लिखित गुलकंद या चित्रपटात दोन भिन्न जोडप्यांच्या नात्यांचा प्रवास हलक्याफुलक्या पद्धतीनं मांडला आहे.१ मे २०२५ पासून हा चित्रपट जवळच्या सिनेमागृहात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.