गुलाबराव देवकरांना राष्ट्रवादीत बंदी ,लावले बंदीचे फलक
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस : शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी अजित पवार गटात जाण्याचे संकेत दिले. त्यांनी अजित पवार गटात जाण्याची तयारी करताच अजित पवार गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून त्यांच्या प्रवेशाला टोकाचा विरोध करण्यात आलाय. ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी त्यांच्या पक्षप्रवेशाला जाहीर विरोध केलाय. यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जळगावातील पक्ष कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच गुलाबराव देवकर व त्यांच्या समर्थकांना प्रवेश बंदीचा फलक लावण्यात आला आहे. या सर्व प्रकाराची जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
गुलाबराव पाटलांनी केला पराभव
गुलाबराव देवकर यांनी नुकतीच जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. शरद पवार गटाने त्यांना उमेदवारी दिली होती. देवकरांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या तिनही पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांचा प्रचारही केला. मात्र, शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी देवकरांचा ५९ हजारांच्या मताधिक्याने पराभव केला.राज्यात महायुतीची सत्ता आली. त्यामुळे आता देवकरांनी समर्थक व कार्यकर्त्यांकडून आग्रह होत असल्याचे कारण देत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याची तयारी केली. यासाठी आपण प्रदेशाध्यक्ष तटकरे यांना भेटल्याचेही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयामध्ये गुलाबराव देवकरांना बंदी असल्याचा फलक लावला असून, त्याची चर्चा होत आहे. दरम्यान, मित्रपक्ष शिवसेना ठाकरे गटाने देवकरांच्या प्रचारासाठी विधानसभा निवडणुकीत मेहनत घेतली, तरी देखील आता ते अजित पवार गटात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत धरणगावात आत्मक्लेष आंदोलन केले.