गोरेगावातून १.४७ कोटी हिऱ्याची चोरी; आरोपी अटक
मुंबई : गोरेगाव येथील जवाहर नगर येथे असलेल्या हिऱ्याच्या कारखान्यात हिरे कापण्याचे काम करणाऱ्या कारागिरानेच १ कोटी ४७ लाख रुपयांचे हिरे चोरल्याचे उघड झाले आहे. सचिन मकवाना (वय ४०) असे आरोपीचे नाव असून तो मुळचा गुजरातचा आहे. त्याला पोलिसांनी अटक केली.
पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी - हिरे व्यापारी किरण रोकाणी हे कांदिवली येथे राहतात. त्यांचा किरण रतीलाल रोकाणी नावाचा हिरे कापण्याचा कारखाना गोरेगाव येथील जवाहरनगर येथे आहे. गोरेगावमध्ये जेम्स नावाचे दुसरे युनिट किरणचा मुलगा चालवतो, ज्यामध्ये आरोपी सचिन आणि इतर नऊ कारागीर काम करतात. या कंपनीचे व्यवस्थापक महेश काटे आहेत.
महेश स्वतः सर्व कारागिरांना नक्षीकामासाठी हिरे देतात १० डिसेंबर रोजी त्यांनी सचिनला १ कोटी ४७ लाख रुपये किमतीचे ४९१ कॅरेटचे हिरेही दिले होते. हे हिरे सचिन घेऊन पळून गेला होता. महेश काटे यांनी किरण रोकाणी यांना या घटनेची माहिती दिली. रोकाणी यांनी गोरेगाव पोलिस ठाण्यात सचिनविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुखे आणि पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांच्या नेतृत्वाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश उमरे यांच्या पथकाने या घटनेचा तपास केला. १२० सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने गोरेगाव, मालाड, दहिसर, भिलाड, वापी, सुरत, अहमदाबाद, पालनपूर आदी भागात त्याचा शोध घेण्यात आला.
आरोपी वेशभूषा बदलून पोलिसांपासून वाचण्यासाठी गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशी ठिकाण बदलत होता. राजस्थानच्या सीताफी मधून अखेर सचिनला अटक केले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने हिरे चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीला गेलेला १ कोटी ४७ लाख ७० हजार रुपयांचे ४७० कॅरेटचे हिरे पोलिसांनी जप्त केले आहेत.