गोव्यात ‘गोकुळ’ च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

गोव्यात ‘गोकुळ’ च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी (गोवा) - कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्या., कोल्हापूर (गोकुळ) चे चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक मंडळ यांनी गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची पणजी (गोवा) येथील मुख्यमंत्री निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली असता गोकुळच्या वतीने मुख्यमंत्र्यांना कोल्हापूरची श्री अंबाबाई देवीची प्रतिमा, पुष्पगुच्छ व गोकुळची दुग्ध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला. गोव्यात ‘गोकुळ’ च्या गुणवत्तापूर्ण दुग्धजन्य पदार्थांचा पुरवठा वाढवण्यासाठी संयुक्त सहकार्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी दिली. 

यावेळी बोलताना गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, गोकुळचे दूध व दुग्धजन्य पदार्थ हे अत्यंत गुणवत्तापूर्ण आहेत. गोव्यातील नागरिक तसेच पर्यटकांना गोकुळच्या उत्पादनांचा लाभ मिळावा यासाठी गोवा मिल्क फेडरेशन आणि गोकुळ यांच्यामार्फत काही संयुक्त कार्यक्रम राबविण्यात येतील. शासनाच्या वतीने सहकार्य व मार्गदर्शन निश्चित केले जाईल.

या चर्चेत गोकुळ व गोवा मिल्क फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने गोवा राज्यात गाय दुधाचे मूल्यवर्धित दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा दर्जेदार व स्थिर पुरवठा ग्राहकांना उपलब्ध करून देण्याबाबत सहकार्याची रूपरेषा तयार करण्यासंबंधी चर्चा करण्यात आली. सद्यःस्थितीत गोव्यात दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात असून, त्या तुलनेत नियमित व गुणवत्तापूर्ण पुरवठा मर्यादित आहे. त्यामुळे गोकुळसारख्या गुणवत्ताधिष्ठित संस्थेच्या सहकार्याने ही तफावत भरून काढली जाऊ शकते, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी  यावेळी व्यक्त केला. 

तसेच, गोवा राज्य शासनाच्या मध्यान्ह भोजन योजनेत विद्यार्थ्यांना गाय दूध पावडर किंवा दुधाचा समावेश करण्याबाबत, तसेच गोवा राज्यातील शेती उत्पन्न बाजार समिती (ए.पी.एम.सी.) मार्फत गोकुळचे गाय दूध थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याबाबत, सध्या दुधावर आकारल्या जाणाऱ्या करात सवलत मिळावी यासंदर्भातही चर्चा झाली.

यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोव्यासारख्या प्रगत आणि जागरूक राज्यात गोकुळचे उत्पादने पोहोचवणे ही केवळ व्यवसायिक संधी नसून, गुणवत्तेची बांधिलकीही आहे. गोवा राज्य शासनाने दिलेले सहकार्य आम्हाला अधिक प्रेरणा देणारे आहे.

यावेळी माजी चेअरमन व ज्येष्‍ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, अमरसिंह पाटील, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले तसेच सचिन पाटील, अतुल शिंदे आदी उपस्थित होते.