‘हमें तो अपनों ने लूटा’ – शिवसेनेच्या व्यासपीठावर बडगुजर यांची थेट खंत, राऊत म्हणाले ‘विषयावर बोला’

नाशिक - नाशिकमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या 'निर्धार मेळाव्या' त गटातील अंतर्गत नाराजीचा सूर उफाळून आला. कार्यक्रमात ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांना जबाबदारीची आठवण करून देतानाच, त्यांनी पक्षातील अंतर्गत गटबाजीवर थेट भाष्य केलं. 'हमें तो अपनों ने लूटा...' या वाक्याने त्यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. मात्र त्यांच्या या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी हस्तक्षेप करत, 'अहो बडगुजर, विषयावर बोला,' असं थेट सुनावलं. या प्रसंगामुळे व्यासपीठावरील तणाव क्षणभर वाढलेला दिसून आला.
ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुधाकर बडगुजर यांनी पक्षातील अंतर्गत संघर्षावर थेट बोलताना म्हणाले, हल्ले विरोधकांचे नव्हते, आपल्याच लोकांचे होते. त्यांनी काही लोकं 10 पक्ष फिरून येतात आणि आपल्याला शहाणपण शिकवतात अशी टीका करत आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या राजकीय प्रवासात आलेल्या संघर्षांचा उल्लेख करत त्यांनी सांगितलं, आम्ही पाठीमागून वार करणारे नाही, आमचं रक्तच संघर्षातून तयार झालंय. मात्र त्यांच्या बोलण्याने विषयांतर होत असल्याचं लक्षात येताच संजय राऊत यांनी हस्तक्षेप करत विषयावर मर्यादा ठेवण्याचं सुचवलं.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुखाच्या उमेदवारीबाबत ठाकरे गटात नाराजीचं वातावरण असल्याचं सुधाकर बडगुजर यांच्या वक्तव्यांतून स्पष्ट झालं. सगळ्यांनी उमेदवारीसाठी शिफारस केली होती, लिखित पत्र दिलं होतं. तरी शेवटी नाव टार्गेट केलं गेलं ते माझंच का ? असा सवालही सुधाकर बडगुजर यांनी यावेळी उपस्थित केला.