जगातील पहिला सहशिक्षणाचा प्रयोग कोल्हापूर संस्थानात - श्रीराम पचिंद्रे

जगातील पहिला सहशिक्षणाचा प्रयोग कोल्हापूर संस्थानात - श्रीराम पचिंद्रे

कोल्हापूर -  पहिल्या महायुद्धाच्या अगोदर जपानमध्ये सहशिक्षण सुरु झाले असे सांगतात परंतु; त्याच्याही अगोदर राजर्षी शाहू महाराजांच्या प्रेरणेतून पुरोगामी विचाराचा पहिला सहशिक्षणाचा प्रयोग विद्यापीठ हायस्कूलच्या माध्यमातून कोल्हापूर संस्थानात सुरु झाला. ही सहशिक्षण देणारी शाळा गुरुकुल पद्धतीवर आधारलेली असावी असे त्यांना अभिप्रेत होते. यशवंतराव केळवकर हे या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते असे मत जेष्ठ पत्रकार श्रीराम पचिंद्रे यांनी व्यक्त केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राच्या वतीने सुरु असलेल्या फुले - शाहू - आंबेडकर सप्ताहामध्ये ‘राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षणविषयक कार्य’ या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. 

पचिंद्रे पुढे बोलताना म्हणाले, राजर्षी शाहू महाराज यांनी समाजातील मागासवर्गीय लोकांना शिक्षण देण्याचे कार्य आपल्या संस्थानात केले. त्यासाठी त्यांनी मोफत व सक्तीचे शिक्षण सुरु केले. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सोय केली. त्यांना शिष्यवृत्या सुरु केल्या यातूनच पुढे राष्ट्रसेवेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, कृष्णाबाई केळवकर, भाई माधवराव बागल इत्यादी अनेक लोक तयार झाले. राजर्षी शाहूंनी आधुनिक शिक्षणाचे महत्त्व ओळखून संस्थानातील देवालयांचा खर्च कमी करून तो शिक्षणाकडे वळविला. पंढरपुरातील अन्नछत्र बंद करून त्यावर होणारा खर्च तेथील मराठा वसतिगृहासाठी वळविला. मुलींच्या शिक्षणाचा पुरस्कार करून त्यांच्यासाठी शाळा सुरु केल्या. संस्कृत तसेच वैदिक शिक्षण व शेतकऱ्यांसाठी वेळेची लवचिकता असलेल्या शाळा सुरु केल्या. भारतीय राज्यघटनेत आढळणाऱ्या आरक्षण धोरणाचा पाया राजर्षीनी आपल्या संस्थानात १९०२ साली सुरु केलेल्या आरक्षण धोरणात आढळतो. 

या व्याख्यानांचे आयोजन ऑनलाईनरित्या करण्यात आले होते व ते शिवाजी विद्यापीठाच्या शिववार्ता या युट्युब चॅनेल वरून प्रसारित करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.