छ. राजाराम महाराज (दुसरे) यांच्या अमृतमहोत्सवी जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरित्राचे व रोजनिशीचे मंगळवारी प्रकाशन ..!

कोल्हापूर - छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची शतकोत्तर अमृतमहोत्सवी जयंती १३ एप्रिल २०२५ रोजी होत असून या निमित्ताने १५ एप्रिल २०२५ रोजी मेन राजाराम हायस्कूल येथे सायं. ५.३० वा. राजाराम महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व छत्रपती राजाराम महाराजांच्या जनक घराण्याचे विद्यमान सदस्य श्री. रा. अ. उर्फ बाळ पाटणकर यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये बाळ पाटणकर यांच्या संकल्पनेतून व शिवाजी विद्यापीठ प्रकाशित करत असलेल्या छत्रपती राजाराम महाराज यांच्या जीवनावरील डॉ. इस्माईल पठाण लिखित छत्रपती राजाराम महाराज (करवीर : दुसरे) या चरित्र ग्रंथाचे व डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी छ. राजाराम महाराजांनी युरोप दौऱ्यावेळी स्वहस्ते लिहिलेल्या इंग्रजी डायरीचा मराठी अनुवाद असा संयुक्त ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.
या कर्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू छत्रपती महाराज उपस्थित राहणार असून प्रा.(डॉ.) डी. टी. शिर्के, कुलगुरु शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या हस्ते दोन्ही ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. त्याचबरोबर कार्यक्रमाला ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात व माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर इत्यादी प्रमुख मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) याची कारकीर्द अल्प असली तरी त्यांनी कोल्हापूरच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न आणि युरोप दौरा करण्याचा घेतलेला धाडसी निर्णय व भारताकडे परतताना फ्लॉरेन्स येथे झालेले आकस्मिक निधन यासारख्या अल्प परिचित गोष्टीचा आढावा घेवून महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाला उजाळा देण्याच्या हेतूने व त्यांच्यातील इतर पैलू दोन्ही ग्रंथाद्वारे अधिकाधिक लोकांच्या समोर मांडण्यासाठी शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही. एन शिंदे व विद्यापीठाच्या छत्रपती संभाजी महाराज संशोधन केंद्राचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांच्या सहकार्यातून हा संयुक्त ग्रंथ प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोल्हापूरच्या इतिहासातील अल्प परिचित असे एक नवीन पान लोकांच्या समोर येणार असून हा कार्यक्रम छ. राजाराम महाराज (दुसरे) यांचे जिवंत स्मारक असणाऱ्या मेन राजाराम हायस्कूल येथे १५ एप्रिल रोजी सायं. ५.३० वा. आयोजित करण्यात आला आहे. इतिहासप्रेमींनी व जास्तीत जास्त लोकांनी कार्यक्रमाला उपस्थित रहावे अशी विनंती शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.व्ही. एन. शिंदे व महाराजांचे जनक घराण्याचे सदस्य बाळ पाटणकर यांच्याकडून करण्यात आली आहे.
इतिहासप्रेमी व जन-सामान्यांसाठी कार्यक्रमस्थळी प्रकाशित होणारे दोन्ही ग्रंथ विक्रीसाठी माफक दरात उपलब्ध ठेवण्यात येणार असल्याचे देखील आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.