जागतिक विकासामध्ये महिला अभियंत्यांचेही योगदान महत्त्वाचे-शरण्या मेनन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : द सोसायटी ऑफ द वुमेन इंजिनियर्स (एस.डब्लू.ई) ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला तंत्रज्ञ व अभियंत्यांना सहकार्य, मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारी एक महत्त्वाची संस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरती अभियांत्रिकी व तंत्रज्ञ क्षेत्रात ही स्त्री पुरुष समानता असावी असा मोठा दृष्टिकोन या संस्थेचा आहे. याच दृष्टिकोनातून ही संस्था महिला तंत्रज्ञ व अभियंत्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक जीवनाला मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक पाठबळ देते.
केआयटी अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयांमध्ये गेल्या काही वर्षापासून या व्यासपीठाचे काम अत्यंत सक्रियपणे सुरू आहे. या व्यासपीठाच्या कोल्हापूरच्या अध्यक्षा शरण्या मेनन यांचा केआयटीतील विद्यार्थिनींबरोबर मुक्त संवादाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. महिला अभियंत्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात कशा पद्धतीने प्रगती करावी या बाबत मार्गदर्शन केले.आव्हानात्मक कामांना स्विकारण्याची तयारी आपण केली पाहिजे असा सल्लाही त्यांनी उपस्थित विद्यार्थीनींना दिला.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी या व्यासपीठा अंतर्गत सुरू असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विद्यार्थिनींना दिली.त्याचबरोबर एस.टी.ई.एम. (स्टेम) या नवीन उपक्रमाबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. विद्यार्थिनींच्या अनेक प्रश्नांची मुख्य वक्त्यांनी सविस्तरपणे उत्तरेही दिली.विविध विभागातील विद्यार्थिनीनी मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग घेतला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस डब्ल्यू ई. केआयटी कोल्हापूर च्या समन्वयक प्रा.सुश्मिता सरकार यांनी केले. एस.डब्ल्यू.ई ग्लोबल अम्बॅसिडर कोल्हापूर वैदही शिंदे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.जहिदा खान, प्रा.विनीता माने,प्रा.अश्विनी शिंदे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
या उपक्रमाच्या नियोजनासाठी संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी, अधिष्ठाता विद्यार्थी उपक्रम डॉ. जितेंद्र भाट यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली,उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले यांचे प्रोत्साहन या उपक्रमासाठी मिळाले.