डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक येथे वाचन संवाद उपक्रम
कोल्हापूर प्रतिनिधी : डॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निक कसबा बावडा कोल्हापूर वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत वाचन संवाद हा कार्यक्रम झाला. यावेळी लेखक प्रा. युवराज कदम यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना प्राध्यापक युवराज कदम यांनी सांगितले की, अधिकाधिक वाचनामुळे विविधांगी ज्ञान संपादनातून बुद्धीचा विकास होतो. वाचन संस्कृती विकसित झाल्याने कौशल्याधारित शिक्षणात भर पडते. वाचन हा जीवनाचा आधार बनला पाहिजे.
साहित्य हे वाचनातून आणि आकलनातून विकसित होत असते.
डिजिटलायझेशनमुळे आपल्याला ज्ञान संपादनास अनेक मार्ग उपलब्ध झाले असले तरी वाचन संस्कृती टिकून राहण्याची गरज आहे. वाचनाचे महत्त्व खूप अधिकाधिक वेळ वाचनासाठी देण्याचे आवाहन युवराज कदम यांनी केले.
प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी सांगितले की, अभ्यासाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचण्याचा छंद विद्यार्थ्यांनी जोपासायला हवा. वाचनामुळे चौफेर विचार करण्याची सवय लागते. एक परिपूर्ण व्यक्तिमत्व तयार होण्यासाठी अवांतर वाचनाची सवय महत्त्वाची ठरते.
त्यासाठी असे वाचन संवाद आणि लेखक भेट हे उपक्रम पॉलिटेक्निकच्या वतीने आयोजित केले जात आहेत.
या निमित्ताने झालेल्या पुस्तक परीक्षण व कथन स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त विद्यार्थी
परिणीता वरुटे ,समृद्धी मेटील , मंजिरी प्रभावळे, राही पाटील हर्षवर्धन रणनवरे यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. स्वागत ग्रंथालय विभाग प्रमुख सीमा पाटील तर आभार
सहायक ग्रंथपाल वैशाली शेंडुरे यांनी मानले. यावेळी उपप्राचार्य नितीन माळी, प्रा. चैत्राली कांबळे, प्रा.प्राची चव्हाण यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.