जिल्ह्यात 'स्टॉप डायरिया ' अभियान राबविणार- कार्तिकेयन एस.
कोल्हापूर जिल्ह्यात डायरिया या आजाराचे प्रमाण वाढू नये म्हणून याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्यासाठी दि.१ जुलै ते दि.३१ ऑगस्ट या कालावधीत अतिसार थांबवा ( स्टॉप डायरिया ) हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा जिल्हास्तरावर शुभारंभ आज संपन्न झाला. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या गावात पाणी व स्वच्छतेमध्ये शाश्वता ठेवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कार्तिकेयन एस. यांनी केले आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोमवार १ जुलै पासून पुढील दोन महिने म्हणजे ३१ आॕगस्टपर्यंत अतिसार थांबवा ( स्टॉप डायरिया ) हे अभियान राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पाण्याची तपासणी एफ.टी.के.द्वारे (पाणी तपासणी संच) करण्यात येणार आहे यामध्ये दूषित आढळलेले पाणी नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात सर्व तालुकास्तरावर या अभियानाची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येऊन ग्रामपंचायत व इतर शासकीय यंत्रणा, सर्व विभाग या अभियानात सहभाग घेऊन आठवडा निहाय नियोजन करण्यात आले आहे. या अभियानामध्ये मुख्यतः पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन व त्याची योग्य हाताळणी, स्वच्छता जागृती कार्यक्रम, पाणी गळतीच्या जागा शोधून त्याची दुरुस्ती करणे, पाणी तपासणी बाबत गाव पातळीवर पोस्टर बॅनर्स लावणेत येणार आहेत. पाणीपुरवठा योजनेतील पाणी गळती शोधून त्याची दुरुस्ती करणे पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे. घरगुती स्तरावरील पाणी साठवणुकीच्या टाक्यांची स्वच्छता करणे पिण्याच्या पाण्याचे स्रोतांची स्वच्छता ठेवणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता याबाबत गावांना सक्षम करण्यासाठी गावातील सर्व घटकांचा या अभियानामध्ये सहभाग घेणेत येणार आहे.
गाव पातळीवर पाणी समितीद्वारे पाण्याचे स्तोत्र स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण ) अंतर्गत गावे ओडीएफ प्लस करणे, गाव पातळीवर कार्यात्मक नळ जोडणी करणे, छतावरील पाणी संकलन हात पंप दुरुस्ती याबाबत प्रत्यक्ष गाव पातळीवर प्रभात फेऱ्या काढून जनजागृती करण्यात येणार असल्याचेही मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कार्तिकेयन एस. यांनी सांगितले. या अभियान शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी सुषमा देसाई, प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, कोल्हापूर, माधुरी परीट, प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन, जि. प. कोल्हापूर, शिल्पा पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी (महिला व बाल कल्याण ), डॉ. संजय रणवीर, अति.जिल्हा आरोग्य अधिकारी, वैजनाथ कराड, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षातील सर्व तज्ञ व सल्लागार उपस्थित होते.