जिल्ह्यातील प्रत्येक गावात वासरू संगोपन स्पर्धेचे आयोजन - प्रा. किसनराव चौगले

कोल्हापूर (प्रतिनिधी) - गोकुळच्या दूध संकलन वाढीमध्ये वासरू संगोपन योजनेचा मोठा वाटा असून वीस वर्षात या योजनेअंतर्गत दूध उत्पादकांना गोकुळने शंभर कोटी रुपये अनुदान वितरित केल्याची माहिती गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले यांनी दिली.
जागतिक दुग्ध दिन आणि देशातील धवल क्रांतीचे शिल्पकार डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुडाळ ता. राधानगरी येथे गोकुळच्या वतीने आयोजित सुदृढ वासरू संगोपन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावतीचे माजी संचालक महादेवराव कोथळकर हे होते.
या स्पर्धेतील विजेत्यांना गोकुळच्या वतीने ट्रॉफी, प्रशस्तीपत्रक आणि रोख बक्षिसे देण्यात येत असून टप्प्याटप्प्याने जिल्ह्यातील प्रत्येक गावात या स्पर्धा आयोजित करण्यात येणार असल्याचेही प्रा. चौगले यांनी यावेळी सांगितले. गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. टी. डांगे यांनी प्रास्ताविक भाषणात वासरांचे संगोपन आणि त्यांचा आहार याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी भोगावतीचे संचालक अभिजीत पाटील, गोकुळचे विस्तार अधिकारी निलेश पाटील, सुकुमार पाटील,सतीश पोवार, नंदकुमार रानमाळे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी म्हैस व गाय गटातील सोळा विजेत्या वासरांच्या पशुपालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीसे प्रदान करण्यात आली. स्पर्धेचे परीक्षक म्हणून जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयेश लोकरे,डॉ. सुजित पाटील यांनी काम पाहिले.
यावेळी गुडाळेश्वर विकास संस्थेचे चेअरमन आनंदराव माळवी, आर. वाय. पाटील, अतुल पाटील, सुहास पाटील, देवराज हालके, रंगराव पाटील, राजेंद्र पाटील, के आर. पुंगावकर, संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.