ताराराणी समाधीप्रश्नी ठाकरे गट आक्रमक ; बुधवारी धरणे आंदोलन

ताराराणी समाधीप्रश्नी ठाकरे गट आक्रमक ; बुधवारी धरणे आंदोलन

कोल्हापूर : रयतेच्या स्वराज्य रक्षणासाठी प्राणपणाने लढलेल्या करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई यांच्या संगम माहुली (सातारा) येथील समाधीचा राज्य शासनाने जीर्णोद्धार करावा, या मागणीसाठी शिवप्रेमींच्या वतीने बुधवारी सकाळी १० ते १२ या वेळेत छत्रपती राजर्षी शाहू समाधीस्थळ या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

करवीर संस्थापिका छत्रपती महाराणी ताराबाई समाधी जीर्णोद्धार समितीची बैठक विजय देवणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्किट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली. ताराराणी यांच्या संगम माहुली समाधीचा शोध २७ डिसेंबर २००६ रोजी घेण्यात आला. २० फूट वाळूखाली असलेली समाधी बाहेर काढण्यात आली. १७ एप्रिल २०१६ रोजी तत्कालीन सातारा पालकमंत्री विजय शिवतारे यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे समाधी जीर्णोद्धारासाठी निधीची मागणी केली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात समाधी जीर्णोद्धाराची बैठक होऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ९२.४६ लक्ष किंमतीच्या अंदाजपत्रकाचा आराखडा केला. २०१७ पासून समिती शासनाकडे पाठपुरावा करत असूनही समाधीची अवस्था 'जैसे थे' आहे. यामुळे हा प्रश्न मार्गी लावण्याकरीता आंदोलनाचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

यावेळी प्रमोद पाटील, शिवशाहीर राजू राऊत, उदय गायकवाड, प्रसाद आडनाईक, चंद्रकांत भोसले, अनिकेत घोटणे, आर्यनील जाधव आदी उपस्थित होते.