शिवरायांच्या अवमानाचे प्रायश्चित सताधाऱ्यांना भाेगावे लागेल-आ. सतेज पाटील
कोल्हापूर ( प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे हा राज्य सरकारचा नाकर्तेपणा असून त्यांची अकार्यक्षमता यातून सिद्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या अवमानाचे प्रायश्चित सत्ताधाऱ्यांना भाेगावे लागेल, असा इशारा काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिला.
आमदार पाटील म्हणाले, आपटेंना नौदलापर्यंत कुणी पोहचवले, त्यांची शिफारस कोणी केली याची माहिती मिळवणे आवश्यक आहे. बदलापूरच्या आपटे पासून कल्याणच्या आपटे पर्यंतचा प्रवास त्यांना वाचवण्यासाठी चालला असल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला. जयदीप आपटेला अटक झाल्याशिवाय यातील सत्य बाहेर येणार नाही असे सांगत आमदार पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सत्ताधाऱ्यांच्या पायाखालची वाळू सरकत चालली आहे. शिवरायांचा अवमान करण्याचे पाप सत्ताधाऱ्यांनी केले असून त्याचे प्रायश्चित त्यांना भोगावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
मग उद्घाटन राजकीय का केले ?
*छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत असताना आम्ही गप्प बसावे, असे सरकारला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. तुम्ही चूक केली आहे. राजकारण आम्ही केले असे वाटते; मग उद्घाटन राजकीय का केले, असा सवाल पाटील यांनी केला*
माफी मागून काय होणार
*माफी मागून काय होणार, जगभर नौदलाची, आमच्या आराध्य दैवताची जी प्रतिमा झाली ती तुमच्या माफी मागण्याने परत येऊ शकणार नाही, या शब्दांत आमदार पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला*