थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर... चौकाचौकात तपासणी नाके..

थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर... चौकाचौकात तपासणी नाके..

कोल्हापूर प्रतिनिधी आरती सुतार :-

2023 ला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. सर्वजण थर्टी फर्स्टच्या पार्टीचे नियोजन करत आहेत. अशावेळी रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालविणे, हुल्लडबाजांकडून कर्णकर्कश हॉर्न, मद्यप्राशन करून वाहने चालविणे, असे प्रकार घडतात. यामुळे शहरवासियांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो यासाठी शहरात १ हजार पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. शहरात ४५ ठिकाणी तपासणी नाके उभारण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.

  शहराच्या सर्वच मुख्य चौकांमध्ये पोलिस पथके तैनात करण्यात येणार आहेत. ३० डिसेंबरपासूनच वाहनांची तपासणी सुरू करण्यात आली. ३१ डिसेंबरच्या रात्रीपर्यंत शिवाजी पूल, गंगावेस, रंकाळा स्टैंड, रंकाळा टॉवर, शिंगणापूर नाका, फुलेवाडी रिंगरोड, नाना पाटील चौक, कळंबा साई मंदिर चौक, संभाजीनगर, रेसकोर्स नाका, सायबर चौक, ताराराणी चौक, भगवा चौक, मध्यवर्ती बस स्थानक, दाभोळकर कॉर्नर, सीपीआर चौक, व्हीनस कॉर्नर, बिंदू चौक, छत्रपती शिवाजी चौक, जनता बझार चौक, राजारामपुरी माऊली पुतळा चौक या ठिकाणी वाहनांची तपासणी व ब्रेथ एनालायझरने मद्यप्राशन करणाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. 

 नवीन वर्षाच्या उत्साहात हुल्लडबाजांकडून कर्णकर्कश हॉर्न, भरधाव वाहने चालविणे, मद्यप्राशन करून वाहने चालविणे असे प्रकार सर्रास घडत असतात. यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली या बैठकीत हुल्लडबाजांकडून प्रसंगी वाहने जागेवरच जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. नदी, तलाव, फार्म हाऊस या ठिकाणी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात येत आहे. पहाटे पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. तरी नववर्षाच्या सुरवातीला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अतिउत्साही तरुणांकडून नियमबाह्य करामती घडताचं यावर तात्काळ कारवाई केली जाईल यावर असा इशारा पोलिस अधीक्षक पंडित यांनी दिला आहे.