पुण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट ; दोन जण मृत्यूमुखी

पुणे : पुण्यात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. वारजे येथील माळवाडी, सर्वे नंबर ५२ गोकुळ नगर इथे एका पत्र्याच्या घरात मंगळवारी मध्यरात्री सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन जणांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.
या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झालं. स्फोट झाल्यानंतर आगीने रौद्र रूप धारण केलं. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवण्याचं काम सुरू केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याचा मारा करत गॅस सिलेंडरच्या स्फोटात लागलेली आग विझवली. यावेळी घरामध्ये दोन पुरुष जखमी अवस्थेत आढळले. त्या दोन जखमी व्यक्तींना पोलिसांच्या मदतीने रुग्णवाहिकेतून तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ससून येथे रवाना केलेल्या जखमींची नावं मोहन माणिक चव्हाण (वय वर्षे ४३), अतिश मोहन चव्हाण, (वय वर्षे २५) आहेत.
गॅस सिलेंडरच्या स्फोटात संपूर्ण घर उद्धवस्त
वारजे इथे पत्र्याच्या घरात झालेला सिलेंडरचा स्फोट इतका भीषण होता, की सिलेंडरचे सर्व भाग वेगळे झाले. सिलेंडरची वरची रिंगदेखील सिलेंडरपासून वेगळी होत उडाली. सिलेंडर पाच-सहा भागात फुटला असून या स्फोटात घरातील सर्व भांडी, इतर सामान, संपूर्ण घर उद्धवस्त झालं आहे. संपूर्ण घरात वस्तू उडून, त्या फुटल्या असून सामानाची राखरांगोळी झाली आहे. सिलेंडरच्या स्फोटात गॅसदेखील पूर्णपणे फुटला असून त्याचे विविध भागात तुकडे झाले आहेत. पत्र्यांचं बांधकाम असलेल्या घराचे पत्रे पूर्णपणे उडाले आहेत.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या स्फोटाचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलिस अध्याप तपास करत आहेत.