धक्कादायक : मोबाइल पोलिसात जमा करतो म्हणणाऱ्यावर केला कुऱ्हाडीने हल्ला

गडहिंग्लज : घराच्या उंबऱ्यावर ठेवलेला मोबाइल पोलिस ठाण्यात जमा करतो म्हणणाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात एकजण जखमी झाला आहे. याप्रकरणी सदाशिव यशवंत बोगरनाळ (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज) यांच्याविरुद्ध गडहिंग्लज पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, हलकर्णी येथे शिवलिंग बसाप्पा मगदूम (वय ५०) आणि सदाशिव बोगरनाळ हे एकाच गल्लीत राहतात. मंगळवारी (८) पहाटे मगदूम यांच्या घराच्या उंबऱ्यावर कुणाचा तरी मोबाईल ठेवलेला आढळून आला. त्यांनी शेजाऱ्यांना बोलावून तो मोबाईल दाखवून त्याबाबत विचारणा केली.
दरम्यान, त्या ठिकाणी आलेल्या बोगरनाळ यांच्या आई गौरव्वा यांनी तो मोबाईल आपला मुलगा सदाशिव याचा असल्याचे सांगितले. त्यावेळी मगदूम यांनी तो मोबाईल पोलिसात जमा करणार असल्याचे सांगितले होते.
बुधवारी (दि. ९) सकाळी ६.३० च्या सुमारास बोगरनाळ यांनी मगदूम यांच्या घराचा दरवाजा ठोठावून शिवीगाळ करायला सुरुवात केली. दरवाजा उघडेपर्यंत पाठीमागील दरवाजापर्यंत आलेल्या बोगरनाळ याने मगदूम यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. त्यामुळे मगदूम यांच्य डोक्यावर व कानाजवळ जखम झाली असून दोन्ही हातांनाही खरचटले आहे.