धनंजय मुंडे नाराज; भुजबळांच्या शपथविधीने राजकीय पेच

धनंजय मुंडे नाराज; भुजबळांच्या शपथविधीने राजकीय पेच

मुंबई : ओबीसी समाजाचा प्रभावशाली राजकीय चेहरा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. १९९१ पासून मंत्रिमंडळात सातत्याने सहभाग असलेल्या भुजबळ यांची ही नववी वेळ आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातून त्यांना पुन्हा संधी मिळाल्यामुळे एकीकडे पक्षाच्या ओबीसी नेतृत्वाला बळ मिळालं असलं तरी दुसरीकडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा पुनरागमनाचा मार्ग अधिक कठीण झाला आहे.

धनंजय मुंडे सध्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंचाच्या हत्येप्रकरणात नाव गोवले गेल्यामुळे मंत्रिपद गमावून बसले होते. वातावरण निवळल्यानंतर त्यांनी पुन्हा मंत्रिमंडळात सहभागी होण्याची आशा व्यक्त केली होती. मात्र त्यांच्या जागी आता भुजबळांना संधी देण्यात आल्याने राष्ट्रवादीचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुंडेंना यावेळी तरी मंत्रिमंडळात स्थान मिळणे कठीण मानले जात आहे.

या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यांच्या नाराजीचा ताप कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतः पुढाकार घेत, त्यांना घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘वर्षा’ निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत त्यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत आश्वासन दिले गेले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळातील पुनरागमन अनेक घडामोडींनी व्यापलेले होते. आधी डावलल्यानंतर भुजबळांनी थेट पक्ष सोडण्याचाही विचार केला होता. मात्र सहकाऱ्यांच्या आणि फडणवीस यांच्या आग्रहावरून त्यांनी संयम ठेवत वाट पाहणे पसंत केले. अखेर सहा महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली. नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सात आमदार असून त्यातील तिघांना मंत्रिपद मिळाले आहे. यामुळे नाशिकने "चौकार" मारल्याची राजकीय चर्चा आहे.

तसेच, भाजपचे पाच आमदार असूनही त्यांच्याकडे एकही मंत्रिपद नसल्याचे दिसून येते, जे अनेकांच्या भुवया उंचावणारे ठरले आहे.