निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी या विधानसभा मतदारसंघातील तयारीबाबत घेतला आढावा
कोल्हापूर (प्रतिनिधी): जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रे सुस्थितीत आणि सर्व सुविधा युक्त असावेत यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज शिरोळ, हातकणंगले व इचलकरंजी विधानसभा मतदार संघातील विविध मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. तसेच सुविधांचा आढावा घेतला.
आवश्यकतेनुसार मतदान केंद्रांची तात्काळ दुरुस्ती डागडुजी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. भारत निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पिण्याचे पाणी, स्वच्छता गृहे, सावली, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांसाठी रॅम्प आदि सुविधा पुरविण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक मतदान केंद्राचे सूक्ष्म नियोजन करुन अंमलबजावणी करावी. पुरेसा सुर्यप्रकाश, रस्ते, विद्युतजोडणी, प्रकाश व्यवस्था यादृष्टीने नियोजन करावे. आयोगाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. चूक मुक्त निवडणुकीची संपूर्ण तयारी जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात करण्यासाठी चांगले नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी या भेटीत दिले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व विधानसभा मतदारसंघातील मतदान तयारीबाबतचा प्रत्यक्ष जावून आढावा घेत आहेत. आजच्या भेटीत त्यांनी निवडणूक कामाशी निगडीत कार्यालय प्रमुख, फिरते तपासणी पथक, स्थिर सर्वेक्षण पथक, व्हिडिओद्वारे पाळत ठेवणारे पथक यांचा आढावा घेतला व कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक सूचना केल्या. त्यानंतर ईव्हीएम स्ट्राँग रुम, मतदान साहित्य वाटप व स्वीकृती ठिकाण आणि मतदान यंत्र ठेवण्यात आलेल्या ठिकाणालाही भेटी दिल्या. यावेळी शिरोळ विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे, हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ति कदम, इचलकरंजी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मौसमी चौगुले, तसेच संबंधित तहसिलदार यांच्यासह स्थानिक प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी त्या त्या ठिकाणी उपस्थित होते. पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र असलेल्या मतदान केंद्रास भेट, साहित्य वाटत व साहित्य स्विकृत ठिकाणी भेट तसेच सुरक्षा कक्ष, मतमोजणी ठिकाणास भेट देवून इमारतींची पाहणी केली. यावेळी त्यांनी ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी देण्यात येणाऱ्या घरबसल्या मतदान सुविधेचा तसेच मतदार माहिती चिठ्ठीच्या वाटपाचा आढावा घेतला.