पर्यावरण संवर्धनासाठी जगाभरातून तज्ञ परिषदेसाठी एकत्र : डॉ. सौरव दीक्षित

यड्राव - शरद इन्स्टिट्युटमध्ये होत असलेली परिषद म्हणजे बुद्धिमत्ता, नवोपक्रम आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मेळावा आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणीय शाश्वतता, ऊर्जा लवचिकता आणि पृथ्वी प्रणाली विज्ञानाच्या समन्वयावर काम करणाऱ्या तज्ञांना एकत्र आणते असे प्रतिपादन चितकारा विद्यापिठाचे प्र - कुलगुरु डॉ. सौरव दीक्षित यांनी केले. ते यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील ‘ग्रीनएआय नेक्सस २०२५’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत (कॉन्फरन्स) अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
डॉ. दिक्षित म्हणाले, या परिषदेसाठी जगभरातून दोनशे शोधनिबंध मिळाले आहेत. त्यातूल उच्च गुणवत्तेचे ७३ शोधनिबंध निवडले आहेत. त्यामध्ये अक्षय ऊर्जा, पर्यावरणीय देखरेख, शाश्वत शेती, स्मार्ट शहरे आणि लवचिक पायाभूत सुविधांमध्ये एआय यासारख्या विषयांचा समृद्ध संग्रह समाविष्ट आहे.
एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे म्हणाले, उद्योगामधील आवश्यक तंत्रज्ञान याचे संशोधन अभियांत्रिकी शिक्षण संस्थेमध्ये होणे आवश्यक आहे. आणि हे सर्व तंत्रज्ञान, संशोधन, कौशल्ये ह्या परिषदेमधून जगासमोर येतात. त्यामुळे अशा परिषदा महत्वाच्या आहेत.
रशिया येथील युनिव्हर्सिटी ऑफ एरोस्पेस अँड इन्स्ट्रुमेंटेशनचे डॉ. किरिल एपिफँटसेव्ह म्हणाले, बदलाच्या पार्श्वभूमीवर शरद इन्स्टिट्युट असे नवोपक्रम, आंतरविद्याशाखीय संशोधन आणि सामाजिक प्रभावासाठी परिषद घेत आहे. त्यामुळे तंत्रज्ञान विकसित होण्यासाठी शरद हि एक पोषक संस्था आहे. म्हणून रशियातील विद्यापीठ महाविद्यालयाशी सामंजस्याचा करार करीत आहोत. पर्यावरणीय प्रश्नासाठी कचऱ्याच्या पुनर्वापराचे संशोधन खूप महत्वाचे आहे. आपले भविष्य वाचवण्यासाठी ते महत्वाचे आहे. प्रदूषणमुक्त भविष्य साध्य करण्यासाठी एआय व समस्या कमी करण्यास मदत करू शकते.
सीएमआर विद्यापीठाचे डॉ. रजत गेरा म्हणाले, आर्टिफिशियल इंटेलिजेंस हवामानाच्या पद्धतींचा अंदाज घेऊन आणि अक्षय ऊर्जेच्या वापराचे अनुकूलन करून पर्यावरण संरक्षणात क्रांती घडवत आहे. हे परिसंस्थांचे निरीक्षण करण्यास, उत्सर्जन कमी करण्यास आणि नैसर्गिक संसाधनांचे अधिक कार्यक्षमतेने व्यवस्थापन करण्यास मदत करते. एआयच्या मदतीने, आपण आपल्या पृथ्वीसाठी एक स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि अधिक शाश्वत भविष्य घडवू शकतो.
के.आर. मंगलंम विद्यापीठाचे प्रा. डॉ कौशल कुमार म्हणाले, मूल्यवर्धित संशोधन, शाश्वत पद्धती इत्यादींच्या बाबतीत जीवन सोपे बनवणे हे एआय तंत्रज्ञानाने होईल. समाजातील गंभीर व मोठ्या समस्या सोडविण्यासाठी तसेच तरुणांसाठी तांत्रिक सल्लागारांना मदत करते.
यावेळी परिषदेचे संयोजक डॉ. गोविंदसिंग पटेल व डॉ. सुकांत देबनाथ यांच्यासह सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, डिन, प्राध्यापक, संशोधक मोठ्या संख्येने उपस्थित होते.