पुन्हा भाकरी फिरणार ? शरद पवार यांच्या 'त्या' व्यक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

माझा महाराष्ट्र ऑनलाईन : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीनीकरणाचे वारे सुरू असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. याला कारण ठरले आहे पक्षाचे नेते शरद पवार यांचे एक महत्त्वपूर्ण वक्तव्य. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी पक्षातील अंतर्गत मतभेद उघड केले आहेत.
“आमच्या पक्षात दोन वेगळे मतप्रवाह आहेत. एका गटाला वाटतं की आपण अजित पवारांसोबत जावं, तर दुसऱ्या गटाला भाजपसोबत जाऊ नये असं वाटतंय,” असं सूचक वक्तव्य शरद पवारांनी केलं. याशिवाय, “इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. विरोधी पक्षात बसायचं की नाही हे सुप्रिया सुळे यांनी ठरवावं,” असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या घडामोडींचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन विचारधारा दिसून आल्या होत्या. काही निवडून आलेल्या आमदारांनी अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जाण्याची इच्छा दर्शवली होती, तर काही अजूनही शरद पवारांच्या भूमिकेशी एकनिष्ठ होते. त्यावर आता खुद्द शरद पवारांनीच उघडपणे भाष्य केल्यामुळे पक्षातील अंतर्गत हालचालींना गती मिळण्याची शक्यता आहे.
काही आमदार अजित पवारांच्या भेटी घेताना दिसले, तर काही अजूनही त्यांच्यावर टीका करत आहेत. यामुळे राष्ट्रवादीत मतभेदाची रेषा स्पष्ट होत चालली आहे. याच दरम्यान, शरद पवार आणि अजित पवार हे वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थित राहिल्याचेही पाहायला मिळाले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात गुप्त बैठकाही झाल्या होत्या, ज्यामुळे दोन्ही गटांमधील जवळीक वाढत असल्याचे संकेत मिळत होते.
आता शरद पवारांनीच सार्वजनिकरित्या पक्षात दोन विचारधारा असल्याचे कबूल केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होणार का, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. “शरद पवार पुन्हा भाकरी फिरवणार का?” असा सवाल राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.