शरद पवार यांचा निष्ठेचा सौदा, यावेळी त्यांना खूप महागात पडणार-समरजितसिंह घाटगे
कागल (प्रतिनिधी) : कागलमधील लढाई हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित सिंह घाटगे अशी नसून धनशक्ती विरुद्ध स्वाभिमानी जनता यांच्यामध्ये आहे. या लढाईत ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांचे आशीर्वाद व स्वाभिमानी जनता यावेळी माझ्यासोबत आहे. पवार यांच्यावर कागलच्या जनतेचे आजही प्रेम आहे. मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यानी स्वार्थापोटी,पवार साहेब यांचेवरील निष्ठेचा सौदा केला आहे. यावेळी हा सौदा त्यांना खूप महागात पडणार आहे. असा टोला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.
कागल येथे ज्येष्ठ कार्यकर्ते व शाहू ग्रुपमधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या स्नेहमेळाव्यात ते बोलत होते.
घाटगे पुढे म्हणाले, स्व:स्वार्थापोटी पवारसाहेब याना अडचणीच्या वेळी सोडून मुश्रीफ साहेब यांनी मोठा धोका दिलेला आहे.याची त्यांना मोजावी लागेल?
कागल मतदारसंघांमध्ये निवडणुकीआधीच पैशाचा प्रचंड वापर सुरू आहे. जनतेची किंमत पैशात केली जात आहे. येत्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वापरला जाणार आहे. विरोधकांना पर राज्यातून पैसा येत आहे.अशी चर्चा आहे.त्यावर माझी करडी नजर आहे. मोठ्या प्रमाणात विकास कामासाठी निधी आणला म्हणणा-या पालकमंत्र्यांना इतर गटांची मदत घ्यावी लागते?.आमच्या कार्यकर्त्यांची फोडाफोडी का करावी लागते? मागील काही निवडणुकीत युवा पिढीला खोटे शब्द दिले.त्यामधे एका पिढीचे आयुष्य बरबाद झाले याला जबाबदार कोण? शाहू फुले आंबेडकरांचे नाव घेता तर मग आजपर्यंत किती गंगाराम कांबळे घडवले? याचा कागल गडहिंग्लज उत्तुर च्या जनतेने विचार करण्याची वेळ आली आहे.
शेंडा पार्कातील अकराशे बेडच्या हॉस्पिटल व जिल्हा बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटन साठी ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणणार म्हणत होते. पण ते आले नाहीत. कारण शहा साहेबांनाही माहित आहे की जो माणूस सर्व काही दिलेल्या शरद पवार साहेबांना फसवू शकतो तर तो आमचा तरी कसा होईल.? त्यांनी कागलमध्येही अशाच पद्धतीचे हॉस्पिटल का आणले नाही?
विकास कामासाठीच्या कोट्यावधी रुपयांच्या मोठ्या निधीचे मुश्रीफ साहेब वारंवार उल्लेख करतात. मात्र हा निधी गेला कुठे ? हा निधी त्यांनी मर्जीतील मोजक्या ठेकेदारांच्या विकासासाठीच आणला. त्यामुळे यावेळी मर्जीतील दोन - तीन ठेकेदारांच्या विकासासाठी मतदार करावयाचे का? हे सुज्ञ जनतेने ठरवले आहे.
माझ्यासह कुटुंबीयांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका होत आहे. माझ्या संस्कारानुसार त्यांना त्या भाषेत उत्तर देणार नाही. कारण मी काय केलेलेच नाही. त्यामुळे कर नाही त्याला डर कशाची. त्यांचा सारखा गुरुच्या पाठीत खंजीर खुपसून निष्ठा विकून मी आलेलो नाही. त्यांना पाहिजे असेल तर मी माझ्या प्रॉपर्टीचे सर्व तपशील देतो.त्यांनी त्याची खुशाल तपासणी करावी. कारण त्यांच्यासारखे जमिनीचे व्यवहार करण्यासाठी मला पार्टनरची आवश्यकता भासत नाही.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवानंद माळी उदयसिंह घाटगे अरविंद रसाळ व राघू हजारे यांनीही मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे राजमाता जिजाऊ महिला समितीच्या कार्याध्यक्षा सौ नवोदिता घाटगे शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे जेष्ठ संचालक व कर्नाटक राज्याचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
*आठवण स्व.मंडलिक साहेबांची*
सोमवारी सात ऑक्टोबर रोजी जिल्ह्याचे स्वाभिमानी नेते माजी खासदार व सदाशिव मंडलिक साहेब यांची जयंती आहे. यानिमित्ताने त्यांना गुरु म्हणणाऱ्या हसन मुश्रीफ यांनी त्यांच्यासह माजी आमदार स्व. शामराव पाटील स्व. राजेसाहेब ,स्व. बाबासाहेब कुपेकर ,यांच्यासह आता ज्येष्ठ नेते शरचंद्र पवार साहेब यांच्या पाठीत स्वतःच्या स्वार्थासाठी खंजीर खुपसला. त्याची आठवण स्व. मंडलिकसाहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी करावी.असे सुचक वक्तव्य घाटगे यांनी केले.