काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याहस्ते उद्या शुक्रवारी कसबा बावड्यात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
कोल्हापूर (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी कसबा बावडा येथील भगव्या चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण होणार आहे. आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांचा बहुशस्त्राधारी भव्य पुतळा साकारण्यात आलं आहे.
खासदार राहुल गांधी हे 4 व 5 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथील शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भव्य अनावरण सोहळा खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते होणार आहे.
खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्याला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी आमदार रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले, माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार विशाल पाटील, खासदार प्रणिती शिंदे, खासदार रजनीताई पाटील, आमदार डॉ. विश्वजित कदम, आमदार मोहम्मद अरीफ नसीब खान यांच्यासह राज्यातील नेते तसेच काँग्रेस आमदार राजू बाबा आवळे, आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याच्या निमित्ताने 5 ऑक्टोबर रोजी सायंकाळी पॅव्हेलियन मैदानावर तब्बल 2 हजार कलाकार शिवाजी महाराजांवरील महानाट्य सादर करणार आहेत. यामध्ये तब्बल 1 हजार कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने केला जात आहे. तरी हा सोहळा आणखी भव्य दिव्य होण्यासाठी शिवप्रेमी, सर्व जिल्हावासीय आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार ऋतुराज संजय पाटील, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष रंगराव पाटील, उपसभापती अनंत श्रीहरी पाटील, सर्व विद्यमान व माजी संचालक, कसबा बावडा-लाईन बाजारमधील सर्व विद्यमान व माजी नगरसेवक ग्रामस्थ, शिवप्रेमी व तरुण मंडळे यांनी केले आहे.