पेन्शन संघटनेचे १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन

पेन्शन संघटनेचे १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांच्या वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावास मंजुरी मिळण्यास होत असलेला विलंब आणि डीसीपीएस/ एनपीएस योजनेतील अनेक प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने १४ जून रोजी जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलन करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी दिली आहे.

               प्राथमिक शिक्षकांना एकाच पदावर एकाच वेतनावर बारा वर्षे पूर्ण झाल्यास वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ दिला जातो. या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून डिसेंबर 2022 पर्यंत बारा वर्षे पूर्ण होणाऱ्या शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी लाभ देण्यासाठी दोन वर्षांपूर्वी प्रस्तावांची मागणी केली होती. पण जवळजवळ दोन वर्ष होत आलेली आहेत तरीही सदर वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्तावांना मंजुरी मिळालेली नाही. प्रस्तावांमध्ये प्रशासनाकडून वारंवार वेगवेगळ्या प्रकारच्या त्रुटी काढण्यात येत आहेत. एकाच वेळी त्रुटी न काढता एक त्रुटी पूर्ण झाल्यानंतर दुसरी त्रुटी निदर्शनास आणून दिली जात आहे. या सर्व एकंदरीत प्रक्रियेस प्रचंड विलंब लागत असून पात्र शिक्षकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या अनुषंगाने या अगोदर जिल्हा प्रशासनाच्या वारंवार भेटी घेण्यात आल्या आहेत. पण प्रस्ताव मंजुरी होण्यास विलंब लागत आहे. या बाबीमुळे कर्मचाऱ्यांच्या मध्ये असंतोष निर्माण झाला आहे. 

              या आंदोलनात मोठ्या संख्येने शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष मंगेश धनवडे यांनी केले आहे. यावेळी संघटनेचे राज्यसह कोषाध्यक्ष श्रीनाथराव पाटील, शिक्षक बँकेचे व्हाईस चेअरमन अमर वरुटे, जिल्हा मार्गदर्शक संजय भोसले, बी एल कांबळे, राहुल कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजय रामाने, जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांढरे, जिल्हा कोषाध्यक्ष निलेश कारंडे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गायकवाड, विश्वनाथ बोराटे, गजानन कुंभार, संजय पाटील, अमोल गायकवाड, जिल्हा मीडिया प्रमुख मारुती फाळके, जिल्हा प्रवक्ते प्रमोद पाटील, जिल्हा आयटी विभाग प्रमुख सुनील पाटील, जिल्हा महिलाध्यक्षा आरती पोवार, जिल्हा महिला सरचिटणीस संगीता कडूकर उपस्थित होते.