डी. वाय.पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची इस्रोच्या प्रशिक्षणासाठी निवड
कसबा बावडा (प्रतिनिधी) : येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स (ए.आय.) व मशीन लर्निंग विभागातील शर्वरी संतोष पाटील व हृषिकेश लक्ष्मीकांत शहाणे या दोन विद्यार्थ्यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अंतर्गत अहमदाबाद येथील स्पेस एप्लिकेशन्स सेंटर येथे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
शर्वरी व हृषिकेश यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, प्रकल्प कार्य आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्यामुळे ही निवड झाली आहे. या प्रशिक्षणाद्वारे त्यांना अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. येथील प्रशिक्षण व अनुभवाचा त्यांना पुढील जीवनात चांगला फायदा होईल असा विश्वास डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. डॉ. गुप्ता यांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, प्राचार्य डॉ. संतोषकुमार चेडे, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग विभागप्रमुख डॉ. सिद्धेश्वर पाटील, प्रा. एस. आर. खोत व विभागातील प्राध्यापक वर्ग यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.