नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदासाठी 1 ते 8 जुलै दरम्यान परीक्षा

कोल्हापूर (प्रतिनिधी) - नोंदणी व मुद्रांक विभागात 'गट-ड' संवर्गातील 284 शिपाई पदांच्या भरतीसाठी दिनांक 22 एप्रिल रोजी वृत्तपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकृती व परीक्षेच्या आयोजनासाठी इन्स्टिट्युट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. 22 एप्रिल ते 16 मे 2025 दरम्यान IBPS कडून ऑनलाईन अर्ज स्वीकृत करण्यात आले होते. आता 1 जुलै ते 8 जुलै या कालावधीत पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रविंद्र बिनवडे यांनी दिली आहे.
परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्र (हॉलतिकीट) IBPS कडून त्यांच्या नोंदणीकृत ई-मेलवर पाठविण्यात येणार आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने स्पष्ट केले आहे की या भरती प्रक्रियेसाठी विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सी किंवा मध्यस्थाची नियुक्ती केलेली नाही. त्यामुळे कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा मध्यस्थ अशा प्रकारची बतावणी करत असल्यास उमेदवारांनी सावध रहावे, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग -2 तथा प्रशासकीय अधिकारी टी.एस.डोंगरे यांनी केले आहे.