बाळासाहेबांचा आवाज वापरून जनतेची दिशाभूल – सामंतांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

रत्नागिरी - नाशिकमधील उद्धव ठाकरे यांच्या निर्धार मेळाव्यानंतर रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. एका भाषणात चंद्रकांत खैरे, दुसऱ्या भाषणात बबनराव घोलप.. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचा व्यासपीठावरच्याच लोकांवर विश्वास नाही. मग दुसऱ्यांवर टीका कशाला? असा सवाल त्यांनी केला.
सामंत म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की माझी शिवसेना काँग्रेससोबत गेली, तर मी दुकान बंद करेन. मात्र, आज उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्याच विरोधात जाऊन काँग्रेसच्या मांडीवर बसलेत. AI तंत्रज्ञान वापरून बाळासाहेबांचा आवाज वापरून भाषण करून केवळ मोदी, शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्यात आली. AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बाळासाहेबांचा आवाज वापरून तयार केलेलं भाषण ही जनतेची दिशाभूल असल्याचा घणाघाही त्यांनी केला.
सामंत पुढे म्हणाले की, शिंदे साहेबांनी ८० पैकी ६० जागा जिंकून सिद्ध केलं आहे की खऱ्या अर्थाने बाळासाहेबांचा वारसा शिंदे गट पुढे नेत आहे. उद्धव ठाकरेंचा निर्धार मेळावा हा केवळ त्यांच्या संघटनेतील आमदार व नेतृत्त्वाला टिकवण्यासाठीचा प्रयत्न होता. उद्धव ठाकरेंच्या भाषणात जे लोक व्यासपीठावर बसले होते त्यांचीच नावे बदलली जात होती. म्हणजेच त्यांच्यावरच विश्वास नाही. मग अशावेळी ते इतर पक्षांवर टीका का करत आहेत? असा प्रश्नही सामंत यांनी उपस्थित केला.