भारत - पाकिस्तान तणावाचा फटका : IPL 2025 स्पर्धा तूर्तास स्थगित

भारत - पाकिस्तान तणावाचा फटका : IPL 2025 स्पर्धा तूर्तास स्थगित

मुंबई - भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2025 स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव गुरुवारी पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणारा सामना रद्द करण्यात आला होता. यानंतरच आगामी सामन्यांबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.

या परिस्थितीचा आढावा घेऊन, बीसीसीआयने सर्व संघ मालकांसोबत चर्चा केली आणि IPL स्पर्धा पुढे चालू ठेवणे सध्या शक्य नसल्याचा निष्कर्ष काढला. त्यामुळे आयपीएलचे उर्वरित सामने तूर्तास होणार नाहीत. यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७ सामने पार पडले असून, १६ सामने अद्याप बाकी आहेत.

धर्मशाला येथे नियोजित असलेला पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आधीच सुरक्षेच्या कारणास्तव अहमदाबादला हलवण्यात आला होता. त्यानंतर दिल्लीविरुद्धचा सामना रद्द झाला आणि आजचा RCB आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामना होणार की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

या निर्णयामागे भारत आणि पाकिस्तानदरम्यान झालेल्या संघर्षाची पार्श्वभूमी आहे. भारताने "ऑपरेशन सिंदूर" अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमाभागांवर प्रतिहल्ला करण्यात आला. गुरुवारी रात्री पाकिस्तानने ड्रोनद्वारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला, पण भारतीय एअर डिफेन्स सिस्टमने तो हल्ला अयशस्वी केला.

सुरक्षा यंत्रणांनी खबरदारीचा उपाय म्हणून सीमाभागांमध्ये ब्लॅकआउटची अंमलबजावणी केली असून देशातील २६ विमानतळ बंद करण्यात आले आहेत. या साऱ्या घडामोडींचा थेट परिणाम IPL 2025 वर झाला आहे. मात्र, बीसीसीआयकडून अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही की स्पर्धा पुन्हा कधी सुरू होईल.