मद्य प्यायलेल्या मुख्याध्यापकाची बदनामीच्या भीतीने आत्महत्या

मद्य प्यायलेल्या मुख्याध्यापकाची बदनामीच्या भीतीने आत्महत्या

 नांदेड : विद्यार्थ्यांसमोर मुख्याध्यापकाने मद्यप्राशन केले. याची तक्रार ग्रामस्थांनी  पोलिस ठाण्यात दिली. बदनामीच्या भीतीने मुख्याध्यापकाने घरी गळफास लावून आत्महत्या केली. गोविंद ज्ञानोबा गायकवाड ( वय ५०) असे आत्महत्या केलेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे. हि घटना लिंबोटी (ता. लोह, जि . नांदेड) येथे घडली. 

 गोविंद गायकवाड लिंबोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक होते. बुधवारी सकाळी ते शाळेत आले. विद्यार्थ्यांना शिकवत असताना त्यांनी मद्यप्राशन केले होते. हा प्रकार पाहून विद्यार्थी घाबरले आणि शाळेबाहेर आले. एका ग्रामस्थाने विद्यार्थ्यांना शाळेच्या बाहेर का आले? याबद्दल विचारले असता हा प्रकार उघडकीस आला. काही वेळातच इतर ग्रामस्थ देखील शाळेत दाखल झाले आणि या प्रकाराची माहिती गावकऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिली.

गटशिक्षणाधिकाऱ्याने या प्रकाराची दखल घेत तात्काळ तीन शिक्षकांना चौकशीसाठी शाळेत पाठवले. यावेळी मुख्याध्यापक गायकवाड हे दारूच्या नशेत आढळले. वर्गात एका थैलीमध्ये दारूची बॉटल आढळली. हा सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. ही माहिती मिळताच मुख्याध्यापक गोविंद गायकवाड घरी गेले आणि त्याच रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी माळाकोळी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.