मोदी तीन वेळा पाया पडले 'त्या' उमेदवाराचं काय झालं ?
![मोदी तीन वेळा पाया पडले 'त्या' उमेदवाराचं काय झालं ?](https://majhamaharashtra.in/uploads/images/202502/image_750x_67a7089a6ec32.jpg)
दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये भाजपचा दिल्लीतील दुष्काळ संपणार असं चित्र दिसत आहे. कारण, निवडणुकांच्या सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर आहे तर आप पिछाडीवर आहे. यापैकी काही मतदारसंघ अत्यंत खास आहेत. त्यापैकीच एक म्हणजे उत्तरखंडचे रहिवासी असलेले रविंद्र नेगी यांचा मतदारसंघ. या निवडणुकीत ते दिल्लीतील पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांची टक्कर आम आदमी पक्षाचे उमेदवार अवध ओझा यांच्याशी आहे.
ओझा यांना दिल्लीचे लोक ओळखतातच पण नेगी तेव्हा चर्चेत आले जेव्हा भाजप उमेदवारांची घोषणा होत असताना एक घटना घडली. पडपटगंज येथून निवडणुकीच्या मैदानात उतरलेले रविंद्र नेगी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श केले. त्यानंतर मोदींनीही तीन वेळा त्यांच्या पाया पडल्या. हे पाहून मंचावर उपस्थित सारेच हैराण झाले, ते साऱ्याच्या चेहऱ्यावरही दिसत होतं. त्यानंतर उपस्थितांच्या चेहऱ्यावर किंचित हसू दिसून आलं. मात्र, तोपर्यंत हा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला होता. काहीच वेळात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा ज्यांच्या पाया पडल्या त्या उमेदवाराचा निकाल काय लागलाय, हा प्रश्न सर्वांना पडला आहे.
सुरुवातीच्या कलांमध्ये रविंद्र नेगी हे आघाडीवर आहेत. तर अवध ओझा हे पिछाडीवर आहेत. मतमोजणीच्या ५व्या फेरीत, भारतीय जनता पक्षाचे उमेदवार रविंदर सिंग नेगी ३०,८९१ मतांनी आघाडीवर आहेत, तर आम आदमी पार्टीचे उमेदवार अवध ओझा ११,९८९ मतांनी पिछाडीवर आहेत.